उन्हाळा सुरू झाला, की घराघरांतून एसी, कूलर, पंखे गरगरायला लागतात. या इलेक्ट्राॅनिक वस्तूंच्या वापरामुळे शरीरावर जसे दुष्परिणाम होऊ शकतात, तसेच विजेच्या खर्चातही वाढ होते. हे दोन्ही परिणाम टाळून उन्हाळा कसा शीतल करता येईल, हे जाणून घेण्यासाठी ‘आयआयटीएम’मधील निवृत्त वरिष्ठ हवामान शास्त्रज्ञ डाॅ. मिलिंद मुजुमदार यांच्याशी श्रीराम ओक यांनी साधलेला संवाद.
उन्हाळ्यातील संध्याकाळ उकाडाविरहित करता येणे शक्य आहे का?
– उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये संध्याकाळी, तसेच रात्रीच्या वेळी तापमानात वाढ जाणवते. त्याचे मुख्य कारण म्हणजे काँक्रिटचे फोफावलेले जंगल. या जंगलात राहणारे मनुष्यप्राणी रात्रीच्या वेळी गारव्यासाठी बंदिस्त खोलीतील छताचे पंखे, कूलर, वातानुकूलित यंत्रांद्वारे गारवा निर्माण करतात. या कृत्रिम गारव्यामुळे विजेच्या वापरात वाढ होते, पर्यायाने विजेची देयके वाढतात. कृत्रिम गारवा निर्माण करण्याच्या प्रक्रियेत घरातील वातावरण एक अंश सेल्सियसने कमी होते, पण वातावरणातील तापमान दोन अंश सेल्सियसने वाढते. या गोष्टी एवढ्यावरच थांबत नाहीत, तर त्याने शारीरिक व्याधीही निर्माण होऊ शकतात. हे सगळे टाळणे आणि संध्याकाळ उकाडाविरहीत करणे शक्य आहे. कृत्रिम उपाययोजनांमुळे आपल्या शरीराची होणारी हानीही आपण रोखू शकतो. कृत्रिम वातानुकूलन यंत्रांमध्ये हवेचे तापमान, आर्द्रता, प्रवाह कृत्रिमरीत्या हाताळला जातो. बराच काळ आपले शरीर या कृत्रिम वातावरणात राहिल्यामुळे या वातावरणाच्या अधीन होते. शरीर विज्ञानाच्या सिद्धान्तानुसार आपले शरीर विभिन्न ऋतूंमध्ये बाह्य वातावरणाशी मिळतेजुळते घेऊन सामान्य रूपाने कार्यान्वित राहते. पण, या कृत्रिम वातावरणाची सवय झाल्यामुळे शरीराचे हे सामर्थ्य कमी होते आणि ते नैसर्गिक वातावरणाशी जुळवून घेण्यास ते असमर्थ होते. हे आपण योग्य उपायांनी टाळू शकतो.
त्यासाठी कोणत्या उपाययोजना आहेत?
– भौतिकशास्त्राच्या सिद्धान्तानुसार, हवेचा प्रवाह नेहमी जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वाहत असतो. हवेचा दाब हाच हवेच्या प्रवाहातील महत्त्वाचा घटक आहे. म्हणूनच बाह्य वातावरणातील अल्हाददायक आणि थंड हवा घरात येण्याकरिता घरातील थंड हवेच्या दाबात बाहेरील हवेच्या दाबापेक्षा अत्यल्प का होईना घट आवश्यक आहे. हा दाब सुयोग्य ठेवायचा असेल, तर छतावरील पंखा हळू लावल्यास हा दाब योग्य राखला जाऊ शकतो. यामुळे घरातील थंडावाही राखला जाऊ शकतो आणि वाढीव वीज देयकापासून सुटकाही करून घेता येऊ शकते. ओली फरशी वाळवण्यासाठी मोठा पंखा करणे योग्यच आहे, पण रेग्युलेटरवर आकडे वाढवलेला पंखा केवळ त्या ओल्या फरशीला कोरडे करण्यासाठीच उपयोगी आहे.
घरातील वाढलेली उष्णता घराबाहेर काढण्यासाठी काय करावे?
– अगदी साध्या, सोप्या आणि कमी खर्चीक अशा उपायाने आपण हे नक्की करू शकतो. यासाठी दोन ‘एक्स्झाॅस्ट फॅन’ची गरज असते. यातील एक एक्झाॅस्ट (इनलेट) पंखा ज्या खिडकीतून घरात सर्वाधिक वेळ वाऱ्याचा प्रवाह येतो, त्या खिडकीत बसवावा, जेणेकरून बाहेरील थंड हवा घरात ओढली जाईल. दुसरा एक्स्झाॅस्ट (आउटलेट) घरातील गरम हवा बाहेर काढण्यासाठी उपयोगात आणावा. शक्य असल्यास तो इनलेट एक्स्झाॅस्टच्या समोरील खिडकी अथवा भिंतीच्या छताजवळ लावावा. अथवा अशा खिडकीजवळ लावावा, जेथून अंतस्थ वायुप्रवाह क्षीण असेल. या पंख्याजवळ चारी बाजूंनी पडदा अथवा थर्माकोल लावल्यास तो वायुरोधी करता येईल, जेणेकरून गरम हवा त्याद्वारे बाहेर जाईल. हे तंत्रज्ञान इस्राइलने उत्तमरीत्या विकसित करून ऊर्जादक्ष आणि वातानुकूलन तंत्रज्ञानाचा आदर्श स्थापित केला. हे तंत्रज्ञान आपण वापरत असताना एकच काळजी घेणे आवश्यक आहे, की हे दोन्ही एक्स्झॉस्ट योग्य ठिकाणी बसवलेले असणे आणि दुसरे म्हणजे घरातील छताच्या पंख्यांचा वेग कमी ठेवणे. या दोन साध्या गोष्टी केल्या, तरी आपल्या बंद खोलीत आपण गच्चीवरील हवेसारखा आनंद घेऊ शकतो. घरातील पंखे रात्रभर संथपणेदेखील फिरत राहण्याची तितकीशी आवश्यकता नसते. पण आपण झोपलेलो असताना, ते सारखे बंद आणि सुरू करणे म्हणजे झोपमोड आहे. ती टाळण्यासाठी पंख्यांना ‘सायक्लिक टाइमर’ लावावेत, जे सहजतेने उपलब्ध होऊ शकतात.
shriram.oak@expressindia.com
