पुणे : अवकाश, सायबर आणि माहितीच्या युद्धक्षेत्रातील उदयोन्मुख तंत्रज्ञानामुळे युद्धाचे स्वरुप बदलत आहे. या नव्या क्षेत्रासाठी लष्करी जवानांना प्रशिक्षित करणे गरजेचे झाले आहे, असे मत लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल जे. एस. नैन यांनी सोमवारी व्यक्त केले. सायबर सुरक्षा, कृत्रिम बुद्धिमत्ता, अवकाश, क्वांटम कम्युटिंग आदी उदयोन्मुख क्षेत्रात विद्यार्थ्यांना लष्करासोबत इंटर्नशीप करण्याची संधी आहे. त्यासाठी मार्गदर्शन आणि आर्थिक पाठबळ दिले जाणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठातर्फे लेफ्टनंट जनरल जे. एस. नैन यांच्या हस्ते लष्कर, नौदल आणि हवाई दलातील सेवानिवृत्त अधिकाऱ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. विद्यापीठाचे कुलपती डॉ. शां. ब. मुजुमदार, प्रधा डॉ. विद्या येरवडेकर, कुलगुरू डॉ. रजनी गुप्ते आदी उपस्थित होते.

लेफ्टनंट जनरल नैन म्हणाले, सशस्त्र दलांनी शांतता राखण्यासोबतच दुर्गम भागात पायाभूत सुविधा उभारण्यात, नैसर्गिक आपत्तीच्या काळात मोलाचे योगदान दिले आहे. पहिल्या चांद्रमोहिमेपासून पोखरणच्या अणुचाचण्यांमध्येही महत्त्वाची भूमिका बजावली. विद्यार्थी हे देशाचे भविष्य आणि समृद्ध वारशाचे संरक्षक आहेत. शिक्षणाशिवाय आपल्यातील क्षमतांची जाणीव होत नाही. उत्कृष्टतेची भूक असणे, त्याची सवय लागणे अत्यंत आवश्यक आहे. अपयशाचा विचार न करता मोठी स्वप्न पाहणे, ती पूर्ण करण्यासाठी धडपडणे, स्वतःलाच आव्हान देत राहणे गरजेचे आहे.

वीरचक्रप्राप्त लेफ्टनंट जनरल (निवृत्त) बी. टी. पंडित यांनी शिक्षण क्षेत्रात सिम्बायोसिसच्या योगदानाचे कौतुक केले. देशाचा पहिला स्वातंत्र्य दिन आणि स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव या दोन्हीचा साक्षीदार आहे. गेल्या ७५ वर्षांत देशात अनेक चांगल्या गोष्टी घडल्या आहेत आणि काही अजून घडणार आहेत. शिक्षण हा भारताला विकसित देश बनवण्याचा एकमेव मार्ग आहे. त्यामुळे महाविद्यालये आणि विद्यापीठांनी राष्ट्र उभारणीत महत्त्वाची भूमिका बजावली पाहिजे, असे डॉ. मुजुमदार यांनी सांगितले.