गेल्या चार वर्षांपासून प्रतीक्षेमध्ये असलेले सातारा हेच आगामी नाटय़संमेलनाचे ‘ठाणे’ असेल. नाटय़संमेलनासाठी ठाणे आणि सातारा यांच्यामध्ये चुरस असली तरी साताऱ्याला हा बहुमान मिळण्याची शक्यता असून, रविवारी (१८ ऑक्टोबर) यासंदर्भातील औपचारिक घोषणा होणार आहे. संमेलन स्थळाबरोबरच नाटय़ परिषदेच्या नियामक मंडळाच्या बैठकीमध्ये या संमेलनाच्या अध्यक्षांचीही निवड होणार आहे.
नाटय़संमेलनाच्या आयोजनाची संधी मिळावी यासाठी चार वर्षांपासून रांगेत असलेल्या सातारकरांची प्रतीक्षा संपुष्टात येणार आहे. आगामी संमेलनासाठी जळगाव आणि नागपूरसह सात ठिकाणांहून निमंत्रणे आली होती. अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेने सातारा आणि ठाणे या दोन ठिकाणी स्थळ निवड समिती पाठविली होती. या दोन्ही ठिकाणचा अहवाल प्राप्त झाला असून, रविवारी होणाऱ्या नियामक मंडळाच्या बैठकीमध्ये या अहवालासंदर्भात विस्तृत चर्चा होऊन निर्णय घेतला जाणार आहे. ठाणे हे मुंबईला जवळ असल्याने रंगकर्मी मोठय़ा प्रमाणावर संमेलनास उपस्थित राहू शकतील, असाही युक्तिवाद केला जात आहे.
सातारा येथील नाटय़ परिषदेची शाखा चार वर्षांपासून संमेलनाच्या आयोजनाची संधी मिळावी यासाठी प्रयत्नशील आहे. १२-१२-१२ या तारखेचा अनोखा योग साधून नाटय़ परिषदेने बारामती शाखेला नाटय़संमेलन दिले होते. त्यानंतरचे संमेलन पंढरपूरला झाले. सीमावर्ती भागातील मराठी बांधवांच्या पाठीशी आहोत हे दाखवून देण्यासाठी आगामी नाटय़संमेलन बारामती येथे घेण्यात यावे, असा ठराव पंढरपूर येथील संमेलनाच्या समारोप सत्रात संमत करण्यात आला होता. त्यानुसार हे संमेलन बेळगाव येथे झाले. त्यामुळे आता तरी हे संमेलन सातारा शहराला मिळावे ही सातारकरांची इच्छा असून, त्यादृष्टीने तयारी पूर्ण केली असल्याचे नाटय़ परिषदेच्या सातारा शाखेचे अध्यक्ष शिरीष चिटणीस यांनी सांगितले.
संमेलन स्थळाबरोबरच अध्यक्षही ठरणार
नाटय़ परिषदेच्या रविवारी होणाऱ्या नियामक मंडळाच्या बैठकीमध्ये संमेलन स्थळाबरोबरच या संमेलनाचे नियोजित अध्यक्षही निश्चित होणार आहेत. ज्येष्ठ नाटककार प्रेमानंद गज्वी, श्रीनिवास भणगे, गंगाराम गवाणकर यांच्यासह ज्येष्ठ अभिनेते डॉ. विश्वास मेहेंदळे अशी चार नावे असून, त्यापैकी एका नावावर शिक्कामोर्तब करण्यात येणार आहे. नाटय़संमेलन साताऱ्याला मिळाल्यास एका नावासाठी सातारकर इच्छुक आहेत. मात्र, अशी इच्छा पूर्ण होईल की नाही याचे उत्तरही रविवारी मिळेल, असे नियामक मंडळाच्या एका सदस्याने सांगितले. सोलापूर येथे झालेल्या नाटय़संमेलनाच्या अध्यक्षीय निवड प्रक्रियेमध्ये सोलापूरकर एका नावासाठी आग्रही होते. मात्र, नियामक मंडळाच्या बैठकीमध्ये मतदान होऊन दुसरीच व्यक्ती अध्यक्षपदी निवडून आली होती हा दाखलाही त्यांनी दिला.