पुणे : मुंबई-बेंगळुरू बाह्यवळण मार्गावरील नवले पूल परिसरात आंदोलन करण्यास बंदी घालण्यात आली आहे. पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी याबाबतचे आदेश दिले.
नसरापूर अत्याचार प्रकरणानंतर संतप्त नागरिकांनी मुंबई-बेंगळुरू बाह्यवळण मार्गावरील नवले पूल परिसरात शनिवारी (२ मे) सायंकाली आंदोलन केले. आंदाेलनात सहभागी झालेल्या नागरिकांनी आरोपीला कठोर शिक्षा करण्याची मागणी करून चार तास या भागात रास्ता रोको आंदोलन केले.
आंदोलनामुळे या भागातील वाहतूक ठप्प झाले. मुंबई, तसेच साताऱ्याकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली. दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या. वाहनांची रांग पंधरा किलोमीटरपर्यंत गेली होती. वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका, प्रवासी, मालवाहू वाहने अडकून पडली होती. नागरिक, तसेच प्रवाशांनी याबाबतची तक्रार पोलीस नियंत्रण कक्षाकडे केली होती. या घटनेनंतर पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी घटनास्थळी धाव घेऊन आंदोलकांशी संवाद साधला.
‘आरोपीविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येणार आहे. या प्रकरणाच्या तपासावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जातीने लक्ष ठेवले आहे. पीडित बालिका, तसेच तिच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी पोलीस कटीबद्ध आहेत’, असे त्यांनी सांगितले. अखेर चार तासानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. रात्री साडेदहानंतर या भागातील वाहतूक सुरळीत झाली.
काही जण नवले पूल परिसरातून जाण्यास तयार नव्हते. पोलिसांनी त्यांची समजूत घातली. अखेर सैाम्य बळाचा वापर पोलिसांना करावा लागला. त्यानंतर या भागातील वाहतूक सुरळीत झाली. यापार्श्वभूमीवर बाह्यवळण मार्ग, तसेच नवले पूल परिसरात आंदोलन करण्यास मनाई करण्यात आली आहे, असे आदेश पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिले.
याबाबत पोलीस आयुक्त अमितेशकुमार म्हणाले, ‘ मुंबई-बेंगळुरू बाह्यवळण मार्ग हा महत्त्वाचा आहे. कायदा आणि सुव्यवस्था, तसेच वाहतूक विचारात घेऊन या भागात आंदोलन करण्यास मनाई करण्यात आली आहे. यापुढील काळात नवले पूल परिसरात आंदोलन केल्यास पोलिसांकडून कायदेशीर कारवाई करण्यात येईल. पोलिसांचे आदेश धुडकाविल्याप्रकरणी संबंधितांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात येतील.’
