पुणे : नवले पूल परिसरातील अपघात रोखण्याच्या दृष्टीने विविध उपाययोजना करण्यात येत असून सहा हजार कोटी रुपयांचा उन्नत प्रकल्प हाती घेण्यात आला असून तो मंजुरीसाठी केंद्र सरकारकडे पाठविण्यात आल्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी विधानसभेत सांगितले. शहरातील स्वामीनारायण मंदिर ते नवले उड्डाणपूल परिसरातील अपघातासंदर्भात खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे आमदार भीमराव तापकीर यांनी विधानसभेत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता.
त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वतीने गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी उत्तर दिले. नवले पूल परिसरात १३ नोव्हेंबर रोजी झालेल्या अपघातामध्ये आठ जणांचा मृत्यू तर, २० ते २५ नागरिक जखमी झाले होते. नवले पूल परिसरात यापूर्वीही सातत्याने अपघात घडल्यामुळे वाहतुकीच्या दृष्टीने हा पूल धोकादायक होत असल्याची बाब तापकीर यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली.
राष्ट्रीय महामार्गाचा पाच ते सहा किलोमीटर अंतराचा भाग तांत्रिकदृष्ट्या संवेदनशील आहे. जड वाहनांमुळे परिसरात वाहतूक कोंडी होत असून अपघातांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे उन्नत मार्गिकेचे काम हाती घेण्यात आले आहे. नवले पूल परिसरातील अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी वाहतूक शाखेकडून विविध उपाययोजना करण्यात आल्या असून रस्त्याचे रुंदीकरण, जंक्शनचा विकास, उन्नत पूल दोन टप्प्यात करण्यात येणार आहे.
याअंतर्गत स्वामी नारायण मंदिर ते सनसिटी, वारजेपर्यंत उन्नत पूल प्रस्तावित आहे. याशिवाय रम्बलर स्ट्रीप, वाहने न्यूट्रल मोडवर चालवू नयेत, अशी सूचना देणारे फलक, ताशी ४० किलोमीटरची वेग मर्यादेचे फलक, स्पीड कॅमेरे, वेग तपासणी यंत्रणांद्वारे वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत असल्याची माहिती सभागृहात देण्यात आली.
