आधुनिक युगात तंत्रज्ञानाची गरज आणि त्याचे भविष्यातील महत्त्व ओळखून यंदाच्या गणेशोत्सवातून ‘डिजिटल साक्षरतेचा’ संदेश देण्याचा संकल्प येरवडा येथील ‘नवज्योत मित्र मंडळ’ यांनी केला आहे. गेल्या अनेक वर्षापासून हे मंडळ विज्ञान, तंत्रज्ञानावर आधारित देखावे साकारत आले आहे.
मंडळाचे हे ५२ वे वर्ष असून, यंदा गणेशोत्सवात ‘एआय’ अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता आणि ‘रोबोटिक्स’चा मानवी आयुष्यातील वापर दर्शवणारा देखावा साकारण्यात आला आहे, अशी माहिती मंडळाचे उत्सवप्रमुख अमित जाधव यांनी दिली.
नवज्योत मित्र मंडळ हे गेल्या काही वर्षांपासून वैज्ञानिक आणि सामाजिक प्रबोधन करणाऱ्या विषयांवर आधारित देखावे सादर करत आहे. यापूर्वी मंडळाने ‘इस्रोचा प्रवास’ तसेच ‘स्वराज्याचे आरमार ते आजचे भारतीय नौदल’ या विषयांवर आधारित देखावे सादर करून नवीन पिढीला वैज्ञानिक प्रगतीची ओळख करून दिली होती.
यंदा त्याच परंपरेला पुढे नेण्यासाठी एआय आणि रोबोटिक्सचा संरक्षण आणि कृषी क्षेत्रात कसा उपयोग होऊ शकतो, यावर आधारित देखावे तयार करण्यात येत आहेत.
या ठिकाणी मातीची आर्द्रता तपासून मोबाइलवर अलर्ट देणारे सेन्सर्स याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात येत आहे. याबरोबरच भविष्यात फळांचे नुकसान न होता त्यांची अचूक पाहणी आणि काढणी करण्यासाठी रोबोटिक आर्मचा वापर कसा केला जाऊ शकतो, याचे मॉडेलही आहे. नागरिकांशी आणि मुलांशी थेट संवाद साधणारा, देखाव्याची माहिती देणारा आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देणारा एक रोबोटही येथे पाहायला मिळतो. डिजिटल साक्षरतेसोबतच दररोज वापरल्या जाणाऱ्या व्हॉट्सॲप, फेसबुक व इतर समाज माध्यमांचा वापर करताना होणाऱ्या चुका आणि सायबर सुरक्षेची काळजी कशी घ्यावी, याचे मार्गदर्शन करणारे विशेष दालन असेल. त्रिमितीय प्रिंटिंग, ऑगमेंटेड रिॲलिटी आणि आभासी वास्तवचा अनुभवही येथे नागरिकांना मिळत आहे.
डीआरडीओ शास्त्रज्ञांचा हातभार
या देखाव्याचे मुख्य आकर्षण म्हणजे ‘डीआरडीओ’ आणि भारतीय सैन्याने संयुक्तपणे विकसित केलेल्या ‘दुर्गा’ नावाच्या लेझर आधारित अँटी-ड्रोन सिस्टीमची प्रतिकृती आहे. याचे प्रात्यक्षिक डीआरडीओच्या शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. या देखाव्यांमध्ये संरक्षण दलातील शास्त्रज्ञांचे सहकार्यही लाभले. हे यंदाचे वैशिष्ट्य आहे.
उत्सव प्रमुख अमित जाधव हे स्वतः ‘डीआरडीओ’मध्ये अधिकारी म्हणून कार्यरत असल्यामुळे, डीआरडीओमधील अनेक ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञांचे थेट सहकार्य व मार्गदर्शन मंडळाच्या देखाव्यांना लाभले आहे. यापूर्वी इस्रोचे रॉकेट्स आणि ‘आयएनएस विक्रांत’चे मॉडेल तयार करतानाही याच शास्त्रज्ञांनी अचूक स्केलिंग आणि ड्रॉईंगसाठी मोलाची मदत केली होती.
या उपक्रमासाठी मंडळाचे किरण भोत्रे शुभम पोल, विकास भोत्रे, अक्षय राजपूत आणि राहुल राजपूत तसेच मंडळाच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले आहेत.
शिक्षणाचा प्रसार आणि तंत्रज्ञान साक्षरतेसोबतच सामाजिक बांधिलकी जपण्यातही हे मंडळ नेहमी पुढे असते. मंडळाच्या वतीने वर्षभर सामाजिक उपक्रम राबवले जातात. भीमाशंकरसारख्या अत्यंत दुर्गम भागातील तसेच जिल्हा परिषदेच्या शाळांमधील गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शालेय साहित्य व मदत पोहोचवण्याचे कार्य मंडळ नियमित करते.
कैद्यांनी बनवलेल्या मूर्ती
यंदाच्या गणेशोत्सवाचे आणखी एक विशेष वैशिष्ट्य म्हणजे, येरवडा मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांनी बनवलेल्या शाडूच्या २१ ते २२ गणेशमूर्ती मंडळाने कारागृह प्रशासनाकडून अधिकृतपणे खरेदी केल्या आहेत. या मूर्तींचे गणेशोत्सवापूर्वी गरजू कुटुंबांना मोफत वाटप केले जाणार आहे. यामुळे एका बाजूला कैद्यांच्या पुनर्वसन योजनेला हातभार लागेल, तर दुसऱ्या बाजूला गरजू कुटुंबांच्या घरी बाप्पाची मोफत स्थापना होईल.
१४ वर्षांपासून ‘डीजे’मुक्त पारंपरिक मिरवणूक
येरवडा भागात जिथे मोठ्या ध्वनिक्षेपकाच्या भिंतींचा वापर केला जातो, तिथे नवज्योत मित्र मंडळ गेल्या १४ वर्षांपासून एकही डीजे न वापरता अत्यंत शिस्तबद्ध व पारंपरिक पद्धतीने मिरवणूक काढते. गेल्या वर्षी त्यांनी नंदुरबारहून आदिवासी कलापथक मागवून त्यांच्या कलेला व्यासपीठ दिले होते, तसेच मर्दानी खेळांचे प्रदर्शन आयोजित केले होते. यंदाच्या मिरवणुकीत मुलांनी व्यसनाधीनतेपासून दूर राहावे आणि योगा, कसरत व खेळांकडे वळावे यासाठी मल्लखांब’ खेळाची प्रत्यक्ष प्रात्यक्षिके समाविष्ट केली जाणार आहेत. विज्ञान, तंत्रज्ञानाची धरत समाजाला या बाबतीत साक्षर करणाऱ्या या मंडळाचे वेगळेपण त्यामुळेच अधोरेखित होते.
