पुणे : नवरात्रोैत्सवात नारळाच्या मागणीत वाढ झाली आहे. तमिळनाडू, कर्नाटक, केरळ, आंध्र प्रदेशातून मार्केट यार्डातील भुसार बाजारात दररोज दीड ते दोन लाख टन एवढी नारळाची आवक होत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा नारळाचे दर पाच ते दहा टक्क्यांनी कमी झाले आहेत.
‘नवरात्रौत्सवात देवीला तोरण अर्पण करण्याची प्रथा आहे. तोरण, तसेच विविध धार्मिक विधींसाठी नवरात्रौत्सवात नारळांना मागणी वाढते. नवरात्रौत्सवानंतर दिवाळीत नारळांना मागणी वाढते. मार्केट यार्डातील भुसार बाजारात दररोज दीड ते दोन लाख टन एवढी नारळाची आवक होत आहे. नारळाला मागणी चांगली आहेत.
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा नारळाच्या दरात पाच ते दहा टक्क्यांनी घट झाली आहे’, अशी माहिती मार्केट यार्डातील नारळाचे व्यापारी दीपक बोरा यांनी दिली. नारळांना मागणी वाढली असली तरी, मागणीच्या तुलनेत आवक चांगली होत आहे. त्यामुळे नारळाचे दर स्थिर आहेत. कर्नाटकातील नारळाचा वापर तेलनिर्मितीसाठी केला जातो. नवरात्रौत्सवात नारळाला सर्वाधिक मागणी दसऱ्याला असते.
घाऊक बाजारात शेकडा नारळाचे दर
नवा नारळ – २३०० ते २६०० रुपये
पालकोल – २७०० ते २८०० रुपये
मद्रास – ४२०० ते ४४०० रुपये
सापसोल – ३२०० ते ४७०० रुपये
नवरात्रौत्सवात धार्मिक विधी, तसेच तोरण वाहण्यासाठी नव्या नारळाला मागणी असते. तमिळनाडूतून नव्या नारळाची आवक होते. नव्या नारळाचा वापर खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी केला जात नाही. मद्रास, सापसोल, पालकोल या नारळांचा वापर खाद्यपदार्थात केला जातो. उपाहारगृहचालक, मिठाईविक्रेत्यांकडून या प्रकारच्या नारळाला मागणी असते. – दीपक बोरा, नारळ व्यापारी, मार्केट यार्ड, भुसार बाजार
