सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते व अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांच्या सत्रामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे. या दोन्ही नेत्यांकडून एकमेकांवर गंभीर आरोप केले जात आहेत. तर, आता हा वाद सत्ताधारी विरुद्द विरोधक असा निर्माण होताना दिसत आहेत. मलिकांनी आज पत्रकारपरिषदेत देवेंद्र फडणवीसांवर अंडर्वर्ल्डशी संबंध असल्याचे गंभीर आरोप केले आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना, नवाब मलिकांवर निशाणा साधला. नवाब मलिक स्वतःची कबर स्वतःच खोदताय, सध्या ते सैरभैर झाले आहेत. असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

पुण्यात माध्यमांशी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी म्हटले की, “नवाब मलिकांनी आ बैल मार मझे असं सुरू केलेलं आहे. त्यांना धावता धावता कळत नाही की समोर खड्डा आहे. त्यांना केवळ निष्ठा कळते आणि त्या निष्ठेने ते मिळालेल्या मार्गदर्शक सूचनांच्या आधारे ते बोलत आहेत. पण त्यांना हे कळत नाही की ते स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारत आहेत. रोज तेच कबुली देत आहेत की ही जमीन मी घेतली, ही कमी किमतीत घेतली. तेच मान्य करत आहेत की त्या जमिनी नंतर ज्यांना टाडा लागणार होता. नंतर ज्या जप्त होणार होत्या, त्या स्वतःत त्यांनी घेतल्या हे तेच मान्य करत आहेत. यामध्ये ते स्वतःची कबर स्वतः खोदत आहेत. नवाब मलिक सैरभैर झाले आहेत. आम्ही सर्वजण एकजुटीने देवेंद्र फडणवीसांच्या पाठीशी आहोत, देवेंद्र फडणवीस स्वतः कणखर आहेत. आता एकच पत्ता त्यांनी बाहेर काढला अजून अनेक पत्ते ते बाहेर काढतील. त्यामुळे मी पुन्हा पुन्हा म्हणेन नवाब मलिक स्वतःची कबर स्वतः खणत आहेत.”

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाच्या पार्श्वभूमीवर बोलताना चंद्रकांत पाटील यांनी सांगितले की, “शेवटी असं आहे की ज्याचं जळतं त्याला कळतं. प्रवाशांची जी अडवणूक होतेय ती आहे पण त्याचा त्यांनी विचार करायचा. त्याची चूल पेटणं मुश्कील आहे त्याने विचार करायचा? सरकारने विचार करायला पाहिजे. तुम्ही बसवा त्यांना चर्चा करा. सरकारी कर्मचारी तुम्हाला म्हणण्यात थोडा वेळ लागेल असं सागा, थकीत पगार द्या, बोनस द्या एसटी सुरू होतील. चर्चा सुरू राहील समिती नेमा. एसटी कर्मचाऱ्यांचे नेते सरकार यांची एक समिती नेमा. एसटी कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात बोलणं हे जर राजकारण असेल तर आम्ही ते करणार. महिलांवर होणाऱ्या अन्याया विरोधात बोलणं हे राजकारण असेल तर आम्ही ते करणार. नवाब मलिकांच्या विरोधात बोलणं हे जर राजकारण असेल तर आम्ही ते करणार. ज्याप्रकारे ड्रग्जला संरक्षण देऊन तरूण पिढीचं नुकसान करणं सुरू आहे, त्याविरोधात आम्ही बोललो तर राजकारण होणार असेल तर ते आम्ही करणार. आम्ही विरोधी पक्ष आहोत, विरोधी पक्षाचं हेच काम आहे. की ज्यामुळे लोकाशाहीमध्ये वर्तमानपत्र असतील, न्यायालय असतील, विरोधी पक्ष असेल या सगळ्यांमुळे सरकार ठिकाणावर राहतं.”

याचबरोबर, “एसटी कर्मचाऱ्यांची मूळ मागणी अशी आहे की मागील १७ महिन्यांचे पगार द्या, १५ हजार रुपये बोनस द्या तो देऊन टाका. करोना काळात याच कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने सगळा महाराष्ट्रात समन्वय साधला. एसटी सुरू राहिली, या माध्यामातून मोठ्याप्रमाणावर आशा वर्कर, आरोग्य सेवक यांची ने आण झाली. साहित्यांची ने आण झाली. अनेक एसटी कर्मचाऱ्यांना करोनाचा संसर्ग झाला, काहींचा मृत्यू झाला. त्या एसटी कर्मचाऱ्यांना तुम्ही १५ हजार बोनस देणार नाही? आता तो जो मुद्दा आहे की आम्हाला सरकारी नोकर म्हणा तर त्यावर बसून चर्चा होऊ शकते ना. सरकारी नोकर म्हणा किंवा सरकारी नोकरांचे सगळे अधिकार द्या. विलिनीकरण्चाय मागणीबाबत बसून चर्चा होऊ शकते. सरकारीन कर्मचाऱ्यांप्रमाणे जर त्यांना सगळ्या सुविधा मिळाल्या, तर त्यांचं काही म्हणणं राहणार नाही. जसं आपण धनगरांचा आदिवासीमध्ये समावेश करण्यापूर्वी आदिवासींना जे काही मिळतं ते धनगरांना दिलं, ते संतुष्ट झाले लढा सुरू राहील.” असंही चंद्रकांत पाटील यांनी बोलून दाखवलं.