आदिवासी समाजाच्या प्रश्नांसाठी सुरुवातीला लढणारे नक्षलवादी आता मानवतेच्या विरोधात काम करीत आहेत. नक्षलवादाचा प्रवास दहशतवादाच्या दिशेने होत असून त्याचा बीमोड करणे गरजेचे झाले आहे, असे केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी मंगळवारी सांगितले.
तळेगाव दाभाडे येथील केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) संयुक्त रुग्णालयाचे उद्घाटन शिंदे यांच्या हस्ते झाले. खासदार गजानन बाबर, केंद्रीय गृहसचिव अनिल गोस्वामी, ‘सीआरपीएफ’ चे महासंचालक प्रणय सहाय, विशेष महासंचालक अरुणा बहुगुणा याप्रसंगी उपस्थित होते.
शिंदे म्हणाले, छत्तीसगढ, जम्मू-काश्मीर या राज्यांमध्ये सीआरपीएफचे जवान कार्यरत आहेत. राष्ट्राची सुरक्षा हेच ध्येय असलेल्या दलाचे जवान नक्षलवादाचा मुकाबला करताना जिवाची बाजी लावतात. सुरुवातीला नक्षलवादी आदिवासींच्या समस्या सोडविण्याचे काम करीत होते. मात्र, आता ते आदिवासींची हत्या करण्यासदेखील मागे-पुढे पाहात नाहीत. त्यावरूनच नक्षलवादाची वाटचाल दहशतवादाच्या दिशेने होत असून त्याचा बीमोड करण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे.
अनेक संकटांना सामोरे जात प्राणाची बाजी लावून आपले कर्तव्य जवान चोखपणे बजावतात. मात्र, त्यांचा जीवनस्तर आणि स्वास्थ्यविषयक सेवांची दक्षता घेतली जात नाही. जवान आणि त्यांच्या कुटुंबीयांना वैद्यकीय सेवा देण्याच्या दृष्टिकोनातून या रुग्णालयाची उभारणी करण्यात आली आहे. जवानांना येथे उत्तम आरोग्य सेवा मिळण्यासाठी केंद्र सरकारकडून योग्य ती पावले उचलली जातील, असेही शिंदे यांनी सांगितले.