माफीचा साक्षीदार राजेश चौधरी कबुली जबाबाप्रमाणे साक्ष देण्यास तयार

नयना पुजारी खटल्यातील माफीचा साक्षीदार राजेश चौधरी प्रथमवर्ग न्यायादंडाधिकाऱ्यांपुढे पूर्वी दिलेल्या कबुली जबाबाप्रमाणे साक्ष देण्यास पुन्हा तयार झाला आहे.

नयना पुजारी खटल्यातील माफीचा साक्षीदार राजेश चौधरी प्रथमवर्ग न्यायादंडाधिकाऱ्यांपुढे पूर्वी दिलेल्या कबुली जबाबाप्रमाणे साक्ष देण्यास पुन्हा तयार झाला आहे. या खटल्यातील मुख्य आरोपी योगेश राऊत पळून गेल्यानंतर माझ्या कुटुंबीयांना धमकावल्यामुळे व त्याच्या भीतीमुळे आपल्याला माफीचा साक्षीदार रद्द करून आरोपी करावे, अशी मागणी न्यायालयाकडे केली होती. पण, आता राऊतला पोलिसांनी पकडल्यानंतर पुन्हा कबुली जबाबाप्रमाणे साक्ष देण्यास तयार असल्याचा अर्ज त्याने न्यायालयाकडे दिला आहे.
संगणक अभियंता नयना पुजारी बलात्कार व खून खटल्याची सुनावणी विशेष न्यायाधीश साधना शिंदे यांच्या समोर सुरू आहे. या खटल्यात राऊत पळून गेल्यानंतर साक्ष झालेले दोन साक्षीदार प्रदीप अगरवाल आणि विजय ननावरे यांची बुधवारी पुन्हा
उलटतपासणी घेण्यात आली. आरोपीचे वकील अ‍ॅड. बी. ए. अलुर यांनी आणखी चौघांची दुसऱ्यांदा उलटतपासणी घेण्याची मागणी न्यायालयाकडे केली आहे. त्याला विशेष सरकारी वकील हर्षद निंबाळकर यांनी फक्त एकाची उलटतपासणी घ्यावी. इतर दोघांची आवश्यकता नसल्याचे न्यायालयास सांगितले. मंगळवारी खटल्याचे कामकाज पूर्ण झाल्यानंतर या खटल्यातील माफीचा साक्षीदार राजेश चौधरीने यापूर्वी दिलेल्या कबुलीजबाबाप्रमाणे साक्ष देण्यास तयार असल्याचा अर्ज न्यायालयाकडे केला. राऊत पळून गेल्यानंतर त्याच्या नातेवाईकांनी आपल्या नातेवाईकांना धमकाविले होते. तो पळून गेल्यामुळे त्याची भीती असल्यामुळे आपल्याला माफीचा साक्षीदार रद्द करून आरोपी करावे म्हणून न्यायालयाकडे अर्ज केला होता. पण, त्याला अटक केल्यामुळे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांपुढे दिलेल्या कबुली जबाबाप्रमाणे साक्ष देण्यास तयार असल्याचा मंगळवारी अर्ज केला आहे. तो न्यायालयाने दाखल करून घेतला. या खटल्याची पुढील सुनावणी २३ जुलै रोजी होणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Nayana pujari murder case