न्यायालयाचे आदेश

संगणक अभियंता नयना पुजारी खूनखटल्याची सुनावणी लवकर पूर्ण करण्यासाठी विशेष न्यायाधीश एल.एल येनकर यांनी या खटल्याची दररोज सुनावणी घेण्याचे आदेश बुधवारी दिले.

संगणक अभियंता नयना पुजारी यांचा सन २००७ मध्ये खराडी येथून अपहरण करून खून करण्यात आला होता. आरोपींनी त्यांच्यावर बलात्कार केल्याचेही निष्पन्न झाले होते. खूनप्रकरणात अटक  केलेला आरोपी योगेश राऊत हा ससून रूग्णालयातून पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झाला होता. त्यामुळे या खटल्याची सुनावणी लांबली होती. गेले पाच वर्ष या खटल्याची सुनावणी सुरू आहे. सध्या या खटल्याची सुनावणी विशेष महिला न्यायालयात सुरू आहे. विशेष न्यायालयाने बुधवारी बचाव व सरकारी पक्षाला या खटल्याची दररोज सुनावणी घेण्याचे आदेश दिले.

सरकारपक्षातर्फे या खटल्यात ३७ साक्षीदारांच्या साक्षी नोंदविण्यात आल्या आहेत. सुनावणीसाठी पुढील तारीख हवी असल्यास न्यायालयात अर्ज करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत, अशी माहिती विशेष सरकारी वकील अ‍ॅड. हर्षद निंबाळकर यांनी दिली. सध्या या प्रकरणातील तपास अधिकारी तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक सावंत यांची बचावपक्षाकडून उलटतपासणी सुरू आहे.उलटतपासणीसाठी आतापर्यंत बचावपक्षाकडून १३ तारखा घेण्यात आल्या आहेत. बचावपक्षाकडून अ‍ॅड.बी.ए.अलुर काम पाहत आहेत. गुरूवारी ( २१ जुलै) सावंत यांची बचावपक्षाकडून उलटतपासणी घेण्यात येणार आहे.