पुण्याचा आकार बशीसारखा. भोवताली टेकड्या आणि मध्यवर्ती भाग सखल उंचीचा. शहरातून मुळा, मुठा, पवना, राम आणि देव अशा पाच नद्या वाहतात. या नद्यांचे नाले झाले, म्हणून ‘नदीसुधार’चा तोडगा शोधण्यात आला. आता कोट्यवधी रुपये खर्चून नदीकाठ सुशोभित केला जातो आहे. बशीच्या आकाराच्या पुण्यात पुनर्विकासाचा मुद्दाही आता ऐरणीवर आहे. या सगळ्यात पुणेकरांच्या मनामध्ये बसलेली पुराची भीती काही केल्या कमी होत नाही. पूर काय असतो नि त्यात काय गमवावे लागते, याची आठवण करून देणारा एक रस्ता पुण्यात आहे.
टिळक चौकातून डाव्या बाजूने पुढे आले, की सुरू होतो साहित्यसम्राट नरसिंह चिंतामणी केळकर यांच्या नावचा रस्ता. अलका टॉकीज आणि अप्पा बळवंत चौक, ग्रामदेवी तांबडी जोगेश्वरीचे मंदिर ते पुढे पासोड्या विठोबा मंदिराजवळ इलेक्ट्रिक उपकरणांची बाजारपेठ, असा सगळा परिसर या रस्त्याने जोडला जातो. गर्दीने ओसंडून वाहणाऱ्या या रस्त्यावर काकासाहेब गाडगीळ पुलाजवळ १२ जुलै १९६१ च्या पानशेतच्या पुराची खूण आहे. मोठमोठ्या वाड्यांचे तीन-तीन मजले मुठा नदीला आलेल्या पुरात पाण्याखाली गेलेले. पानशेतचा पूर म्हटले, तरी पुरावेळी वाड्याच्या पत्र्यावर जाऊन बसलेल्या जुन्या-जाणत्यांच्या डोळ्यांत पाणी येते. घर-संसार वाहून जातानाच्या वेदना पुन्हा कुणाच्या वाट्याला यायला नकोत, अशी भावना या पुरातून वाचलेले ज्येष्ठ व्यक्त करतात.
हयात घालवलेले वाडे नि त्या भोवतीच्या परिसराचे रूपडे विकासाच्या वेगात पालटले. आता विकासाची सूज वाढायलाही जागा पुरेशी नाही. अंगण असलेली वाडी आणि घरे आता नामशेष झाली आहेत. या वाड्यांबरोबर तेथील सामाजिक-सांस्कृतिक व्यवहारही नामशेष होत आहेत, की काय अशी अवस्था आहे. १९५२ मध्ये पंडित नारायण वामन दिवाण यांनी सुरू केलेल्या सरस्वती संगीत विद्यालयाचा गंज लागून दिसेनासा झालेला फलक हे चित्र अधिक स्पष्ट करणारा. या संस्थेतून घडलेल्या हजारहून अधिक विद्यार्थ्यांनी शास्त्रीय संगीताचा वारसा जपला. सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यात सुमार होत चाललेले कार्यक्रम आणि दिवसेंदिवस कमी होत असलेल्या सच्च्या रसिकांच्या संख्येत या पडझडीचे परिणाम शोधता येतात. पुण्याचा तोंडवळा बदलणाऱ्या पुरापेक्षाही ते भयंकर असतील, अशी भीतीही व्यक्त केली जाते.
चार पिढ्यांपासून अयोध्याबाई लाहोटी यांच्या ‘भंडारी निवास’ या वाड्यात राहत असलेले विपुल इनामदार सांगतात, ‘आमच्या वाड्यासमोरचा केळकर रस्ता पूर्वी अरुंद होता. आतापेक्षा निम्माच. जवळपास सगळे वाडे पुनर्विकासात निघालेत. पूर्वी आमच्यासमोर दीक्षित वाड्यात पंडित भीमसेन जोशींच्या मैफली व्हायच्या. ते इथे आवर्जून उतरायचे. त्याशेजारीच सवाई गंधर्व महोत्सवाचे पहिले कार्यालय सुरू झाले.’ केळकर रस्त्याच्या आतल्या बाजूला असलेल्या रमणबाग शाळेत पूर्वी सवाई महोत्सव व्हायचा. तिथे येणारे रसिकजन याच रस्त्यावर असलेल्या मंदार लॉजमध्ये उतरायचे. आता शाळेची मैदाने महोत्सवांना देता येत नाहीत.
जवळच असलेला केसरीवाडा लोकमान्य टिळकांचे निवासस्थान. हा वाडा गायकवाड वाडा म्हणूनही प्रसिद्ध. दैनिक केसरीचे कार्यालय आणि मानाचा पाचवा केसरीवाडा गणपती आजही या वाड्याची ओळख टिकवून आहेत. केसरीवाड्याच्या समोर १९४० मध्ये सुरू झालेले नि बटाटे वड्यासाठी लोकप्रिय असलेले प्रभा विश्रांती गृह याच रस्त्यावर आब राखून उभे. हे उपाहारगृह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासारख्या अनेकांच्या आवडीचे. मोदी आणि माती गणपती मंदिरेही याच रस्त्यावर. जवळच असलेला निघोजकर मंगल कार्यालयाचा वाडा आता वडापावसाठी प्रसिद्ध होत आहे. याच रस्त्यावर हिंदू महिला अनाथाश्रम होते. आता आजूबाजूच्या बहुतांश इमारती पुनर्विकासात निघाल्यात. रस्त्यावरच्या झाडांची संख्याही नगण्य म्हणावी अशीच.
‘पूर्वी वाड्याच्या तीन पायऱ्या चढून आतमध्ये जाता यायचे. आता पायरी राहिलीच नाही, रस्ताच उंच झाला. वाड्याच्या बाहेरची मोकळी जागा पूर्वीच रस्त्यामध्ये गेली. पुढे कधी तरी वाडा पुनर्विकासात निघेल, तेव्हा आतली मोकळी जागाही जाईल. त्या बदल्यात बांधण्यात येणाऱ्या इमारतीचे मजले वाढवता येतील, अधिकचा ‘एफएसआय’ मिळेल. पण, आताच पायाभूत सुविधांवर ताण आहे. त्यात इमारतींची जागा टॉवर्सने घेतल्यावर हे कोडे कसे सुटणार,’ असा मघाशी भेटलेल्या इनामदारांचाच सवाल.
अप्पा बळवंत चौकापासून पुढे गेल्यावर कायम गजबज असलेली पुस्तकांची बाजारपेठ दिसते. पदपथावर मांडलेला पुस्तकांचा ढीग नि तो विकण्यासाठी अरुंद गल्लीबोळातून धावपळ करणारे मूळचे, बाहेरचे सगळेच. त्यामुळे केळकर रस्त्यावर या एका ठिकाणी पदपथ असूनही, नसल्यासारखेच. पार्किंगचे कोडेही कायम. नदीला पाणी आले नि बाबा भिडे पूल पाण्याखाली गेला का, गाडगीळ पुलाला (झेड ब्रिज) पाणी लागले का, याचे आकर्षण पुण्यात आलेल्या प्रत्येकालाच असते. गर्दी वाढते आहे तशा गरजाही वाढतात. या रस्त्यावर स्वच्छ-सुंदर कसब्याच्या फलकांखालीच पडलेला कचरा या गर्दीसाठी अपुऱ्या पडणाऱ्या यंत्रणेची साक्ष देतो. रस्त्याच्या आधीपासून असलेला मारुतीचा पार या सगळ्या घुसळणीचा साक्षीदार. आता सुधारत असलेला नदीकाठ ओलांडून मुठेचे पाणी मारुतीच्या पायाला लागणार का, या प्रश्नाचे उत्तर पुनर्विकासाच्या प्रक्रियेत आकाराला येते आहे. ते ‘नाही,’ असेच असावे अशी अपेक्षा तेवढी ठेवायची…
tushar.suryawanshi@expressindia.com
