पुणे : गेल्या १२ वर्षांत देशातील राष्ट्रीय छात्र सेनेचा (एनसीसी) विस्तार करण्यात आला आहे. ‘एनसीसी’ छात्रांची संख्या १३ वरून २० लाखांपर्यंत वाढवण्यात आली असून, स्वयंअर्थसहाय्यित तत्त्वावर अनेक खासगी संस्थांनीही ‘एनसीसी’चा स्वीकार केल्यामुळे त्या अंतर्गत सुमारे २ लाख छात्र प्रशिक्षण घेत आहेत. अद्यापही अनेक शैक्षणिक संस्था ‘एनसीसी’ सुरू करण्यासाठी प्रतीक्षेत आहेत. ‘एनसीसी’चे महासंचालक लेफ्टनंट जनरल वीरेंद्र वत्स यांनी ‘पुणे एनसीसी ग्रुप’ मुख्यालयाला भेट देऊन विविध उपक्रम आणि प्रशिक्षण व्यवस्थेचा आढावा घेतला. महाराष्ट्र संचालनालयाचे अतिरिक्त महासंचालक मेजर जनरल विवेक त्यागी उपस्थित होते. त्यानंतर वत्स यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
वत्स म्हणाले, ‘‘एनसीसी’ ही राज्य आणि केंद्र सरकारची संयुक्त जबाबदारी आहे. ‘एनसीसी’वरील वार्षिक खर्च सुमारे ३५०० कोटी रुपये आहे. बराचसा आर्थिक भार केंद्र सरकारने उचलला आहे. गेल्या १२ वर्षांत छात्रांची संख्या सुमारे ६० टक्क्यांनी वाढली आहे. बदलत्या काळानुसार ‘एनसीसी’मध्ये मोठ्या प्रमाणात बदल करण्यात येत आहेत. ‘एनसीसी’ म्हणजे केवळ कवायत, शिस्त आणि शारीरिक कसरती असे मानले जाते. मात्र, ‘एनसीसी’च्या एकूण प्रशिक्षणापैकी केवळ तीन ते पाच टक्के वेळ कवायतीसाठी दिला जातो. उर्वरित प्रशिक्षणामध्ये लष्करी कौशल्यांसह सामाजिक सेवा, समुदाय विकास, नेतृत्व, व्यक्तिमत्त्व विकास आणि चिकित्सक विचार यांचा समावेश आहे. त्यामुळे छात्रांना भविष्यातील जबाबदार नागरिक म्हणून घडवण्यावर भर दिला जात आहे. विविध उपक्रमांतून छात्रांना सामाजिक प्रश्नांशी छात्रांना जोडले जात आहे.’
‘‘एनसीसी’ प्रशिक्षण घेतलेल्या छात्रांतून अनेक छात्र लष्करात अधिकारी म्हणून निवडले जातात, आता अग्निवीर निवडीतही ‘एनसीसी’ छात्रांचा टक्का लक्षणीय आहे. छात्रांना रोजगारसंधी उपलब्ध करून देण्याचाही प्रयत्न केला जातो. त्या अंतर्गत ‘पंतप्रधान इंटर्नशिप योजने’त ‘एनसीसी’ छात्रांना सहभागी होण्याची संधी देण्यात आली, रोजगार मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले आहे,’ असे वत्स यांनी नमूद केले.
‘कौशल्यविकासातून रोजगारक्षमतेवर भर’
‘छात्रांना भविष्यातील आव्हानांसाठी सज्ज करण्यासाठी कौशल्य प्रशिक्षणावर भर देण्यात येत आहेत. त्या अंतर्गत ड्रोन तंत्रज्ञान, सायबर सुरक्षा, आपत्ती व्यवस्थापन, नेतृत्व, व्यक्तिमत्त्व विकासाचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. भविष्यात शेती, वाहतूक, संरक्षण यांसह विविध क्षेत्रांत ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. त्यामुळे ड्रोन प्रशिक्षणासाठी छात्रांना ‘डीजीसीए’चे, तर सायबर सुरक्षा प्रशिक्षणासाठी ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी’चे प्रशिक्षण देण्यात येते. या प्रशिक्षणामुळे छात्रांच्या रोजगारक्षमतेत वाढ होत आहे. या प्रशिक्षणासाठी प्रत्येक गट स्तरावर प्रशिक्षण केंद्र असणे गरजेचे आहे, असे वत्स यांनी नमूद केले.
