राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार गुजरातधार्जिणे आहे. त्यांना महाराष्ट्राच्या हिताशी काहीही घेणं-देणं नाही, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी केली. केंद्रात मोदी सरकार सत्तेत आल्यापासून महाराष्ट्रावर सातत्याने अन्याय होत आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
तळेगाव येथे होणारा वेदांत-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने भोसरीत आंदोलन करण्यात आले, तेव्हा गव्हाणे बोलत होते. राष्ट्रवादी युवकचे शहराध्यक्ष इम्रान शेख, महिला अध्यक्षा कविता आल्हाट, माजी नगरसेवक पंकज भालेकर, संजय वाबळे, प्रसाद शेट्टी, माया बारणे आदी पदाधिकारी आंदोलनात सहभागी झाले होते.

हेही वाचा : पुणे जिल्ह्यातील १२ तालुक्यांमधील ७२ गावांमधील पशूंना लंपी रोगाची लागण

गव्हाणे म्हणाले,की शिंदे-फडणवीस सरकारने महाराष्ट्रातील दीड लाख युवकांच्या रोजगाराची संधी घालवली. महाराष्ट्रातील मोठमोठे उद्योग, व्यापार, कामधंदे गुजरातला घेऊन जाण्याचा प्रकार गेल्या आठ वर्षांपासून सातत्याने होत आहे. इम्रान शेख म्हणाले,की मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री महाराष्ट्राची भाकरी खातात, पण गुजरातची चाकरी करतात. फडणवीस अल्पकाळाचे मुख्यमंत्री झाले होते, तेव्हाही त्यांनी महाराष्ट्राचे ४० हजार कोटी केंद्र सरकारला परत पाठवले होते. अनेक उद्योगधंदे व महत्त्वाची कार्यालये भाजपच्या महाराष्ट्र विरोधी धोरणामुळे गुजरातला गेल्याचा आरोप शेख यांनी केला.