पुणे : राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर टीका करणे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या राज्य प्रवक्त्या रुपाली पाटील यांना भोवले. पक्षाने नव्याने जाहीर केलेल्या प्रवक्त्यांच्या यादीतून रुपाली ठोंबरे पाटील यांना वगळण्यात आले आहे. नव्याने प्रवक्ते म्हणून जबाबदारी देण्यात आलेल्यांमध्ये पुण्यातील तीन जणांना संधी देण्यात आली आहे. त्यामध्ये महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, हडपसरचे आमदार चेतन तुपे, माजी महापौर राजलक्ष्मी भोसले यांचा समावेश आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या प्रवक्त्या रुपाली ठोंबरे-पाटील आणि महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यात गेल्या काही महिन्यांपासून अंतर्गत वाद सुरू आहे. फलटण येथील महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात रुपाली ठोंबरे यांनी आयोगाच्या अध्यक्षा चाकणकर यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाने रुपाली ठोंबरे यांना नोटीस देत स्पष्टीकरण देण्यास सांगितले होते.

यासाठी सात दिवसांचा कालावधी देण्यात आला होता. सोमवारी प्रवक्त्यांची यादी जाहीर झाली. यामधून ठोंबरे यांच्यासह आमदार अमोल मिटकरी, वैशाली नागवडे यांना डच्चू देण्यात आल्याचे पुढे आले. चाकणकर यांच्यावर केलेल्या टीकेमुळेच ठोंबरे यांना पक्षाने पदावरून दूर केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाने नवीन १७ प्रवक्त्यांची यादी जाहीर केली.

यामध्ये अनिल पाटील, चेतन तुपे, सना मलिक, हेमलता पाटील, राजीव साबळे, सायली दळवी, रुपाली चाकणकर, आनंद परांजपे, राजलक्ष्मी भोसले, प्रतिभा शिंदे, प्रशांत पवार, शशिकांत तरंगे, ब्रिजमोहन श्रीवास्तव, अविनाश आदिक, सूरज चव्हाण, विकास पासलकर आणि श्याम सनेर यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच आधीच्या प्रवक्तेपदाच्या सर्व नियुक्त्या रद्द केल्याचे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, ठोंबरे यांना पदावरून दूर केल्याने त्या कोणती भूमिका घेणार याकडे लक्ष लागले आहे. याबाबत रुपाली ठोंबरे पाटील यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

पक्षांतर्गत भांडणांचा तपास आता पोलीस आयुक्त करणार

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षातील रूपाली ठोंबरे पाटील आणि रुपाली चाकणकर या दोन महिला पदाधिकाऱ्यांमधील भांडण आता टोकाला गेले आहे. या दोन्ही पदाधिकाऱ्यांनी तीन दिवसांपूर्वी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन आपले गाऱ्हाणे मांडले. या दोन्ही महिलांनी एकमेकांच्या विरोधात पोलिसांकडे तक्रार केली आहे. या तक्रारीचा सविस्तर तपास करण्याच्या सूचना पोलीस आयुक्तांना दिल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. या तपासासाठी सक्षम महिला अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे पवार यांनी स्पष्ट केले.