पुणे : ‘पुणे महापालिकेत ज्यांची सत्ता होती. त्यांनी तब्बल ७५ हजार रुपये कोटी खर्च केला. मात्र, पुण्यात ठोस विकासकामे दिसत नाही. रस्त्यांची दुरवस्था झाली. कचऱ्याचे ढीग, पिण्याच्या पाण्याचा तुटवडा, प्रदूषण अशा समस्या शहरात आहेत. विकासकामांसाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले. मात्र, विकास कुठे दिसतो का ?’, असा सवाल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी उपस्थित केला.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रभाग क्रमांक २२ आणि २३ मधील उमेदवारांच्या प्रचारासाठी बुधवारी सभेचे आयोजन करण्यात आले. सोमवार पेठेतील नरपतगिरी चौकात झालेल्या सभेत पवार यांनी शहरातील विकासकामांवर प्रश्न उपस्थित करून महायुतीतील मित्रपक्ष भारतीय जनता पक्षाला कानपिचक्या दिल्या.
‘पुणे शहरातील वाहतूक समस्या दिवसेंदिवस जटील होत चालली आहे. वाहतूक कोंडीत जागतिक स्तरावर पुणे चौथ्या क्रमांकावर आहे. ज्यांच्या हाती सत्ता होती त्यांनी वाहतूकविषयक सुधारणा केल्या नाहीत. वाहतूक कोंडी सोडविण्यात त्यांना अपयश आले. शहरात १२ हजार ५० सफाई कर्मचारी आहे. सफाई कर्मचारी जागेवर दिसत नाहीत. काहींशी संपर्क साधला तेव्हा शहराबाहेर असल्याचे समजले. काहींनी सफाई काम करत नसल्याचे सांगितले. बनावट नावे वापरून सफाई कर्मचाऱ्यांच्या नावावर कोट्यवधी रुपयांचा अपहार केला. याबाबतची कागदपत्रे आणि पुरावे आपल्याकडे आहेत’, असा आरोप पवार यांनी केला.
‘मी कधीही बेछूट आरोप करत नाही. पुराव्यांशिवाय बोलत नाही. समाजाच्या भल्यासाठी मी काम करतो. या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी बदल घडविणे आवश्यक आहे. लोकसभा, विधानसभा, महापालिका निवडणूक वेगवेगळ्या असतात. महापालिकेची सत्ता कोणाच्या हातात द्यायची, हे ठरविण्यासाठी ही निवडणूक आहे. बाहेरचे लोक येऊन आश्वासने देतील. मी पुणेकर आहे. पुणेकरांचे प्रश्न आणि शहराचा विकासासाठी प्रयत्न करणार आहे,’ असे त्यांनी नमूद केले.
