पुणे : लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक शोषण आणि सुमारे दहा लाखांची आर्थिक फसवणूक केल्या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) बारामतीतील जिल्हा परिषद सदस्य मंगेश जगताप यांच्याविरुद्ध माळेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २७ जुलै रोजी जगताप यांच्यावर आरोप करीत राष्ट्रवादी युवती आघाडीच्या बारामती अध्यक्षा यांनी जिल्हा परिषदेत आत्महत्येचा प्रयत्न केला होता.

याबाबत ३६ वर्षीय तरुणीने फिर्याद दिली आहे. फिर्यादी आणि आरोपी मंगेश जगताप यांची २००७ मध्ये महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना ओळख झाली होती. पुढे या ओळखीचे रूपांतर प्रेमसंबंधांत झाले. या काळात आरोपीने त्यांना लग्नाचे आश्वासन दिले होते. परंतु, २०१२ मध्ये मंगेश जगताप याने दुसऱ्या महिलेशी विवाह केल्याचे समजताच फिर्यादी यांनी त्याच्याशी संबंध तोडले. मात्र, काही काळानंतर आरोपीने पुन्हा त्यांच्याशी संपर्क साधला. आपण पत्नीपासून घटस्फोट घेणार असल्याचे सांगत, त्याने काही प्रतिज्ञापत्रे आणि कागदपत्रे दाखवून फिर्यादी व त्यांच्या कुटुंबाचा विश्वास संपादन केला. घटस्फोटाच्या खोट्या आश्वासनावर विसंबून २०१२ ते २०२६ या प्रदीर्घ कालावधीत पणदरे येथील फार्महाऊसवर फिर्यादीचे वारंवार लैंगिक शोषण करण्यात आले.

एवढेच नव्हे तर, वेगवेगळ्या कारणांसाठी ऑनलाइन माध्यमातून फिर्यादीकडून ८ ते १० लाख रुपये घेऊन आर्थिक फसवणूकही केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात आल्यानंतर, २७ जुलै रोजी पुणे जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण बैठकीत फिर्यादी आरोपीला जाब विचारण्यासाठी गेल्या होत्या. मात्र, त्यांना पाहताच आरोपीने पळ काढला. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या फिर्यादी महिलेने भरसभेत स्वतःवर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. तेथे उपस्थित पोलीस आणि सुरक्षारक्षकांनी तत्परता दाखविल्याने मोठा अनर्थ टळला. या प्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. त्यानंतर हा गुन्हा पुणे ग्रामीण मधील माळेगाव पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला. माळेगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक कुलदीप सकंपाळ या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

फिर्यादी यांनी आपल्या तक्रारीत मंगेश जगताप यांच्यासह त्यांच्या पत्नी आणि अन्य नातेवाइकांवरही गंभीर आरोप केले आहेत. फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, या सर्वांनी मंगेश जगताप यांचा लवकरच घटस्फोट होणार असून त्यानंतर फिर्यादीशी विवाह होईल, असे सांगून त्यांचा विश्वास संपादन केला. या आश्वासनांमुळेच आपण मंगेश जगताप यांच्यावर विश्वास ठेवत राहिल्याचा दावा फिर्यादीने केला आहे. मात्र, या प्रकरणात केवळ मंगेश जगताप यांच्याविरुद्धच गुन्हा दाखल आहे.