पुणे : पुणे लोकसभा मतदारसंघाप्रमाणेच मावळ लोकसभा मतदारसंघावरही राष्ट्रवादी काँग्रेसने दावा केल्याने महाविकास आघाडीतील मित्रपक्षात रस्सीखेच सुरू झाली आहे. या मतदारसंघावरून ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमने-सामने येण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टिकोनातून राष्ट्रवादी काँग्रेसची मुंबईत आढावा बैठक झाली. त्या वेळी महाविकास आघाडीच्या जागा वाटपात पिंपरी-चिंचवडमधील काही पदाधिकाऱ्यांनी मावळ लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसकडे घ्यावा, अशी मागणी केली.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून मावळ लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस निवडणूक लढवित आहे. मात्र या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसला आतापर्यंत एकदाही विजय मिळविता आलेला नाही. सन २०१९ पर्यंत भारतीय जनता पक्षाबरोबर युती असलेल्या शिवसेनेने २००९ पासून मावळची जागा सातत्याने जिंकली आहे. गजानन बाबर यांनी प्रथम आणि त्यानंतर श्रीरंग बारणे यांनी दोनवेळा मावळ मतदारसंघातून विजय मिळविला आहे. विद्यमान खासदार श्रीरंग बारणे शिंदे गटात गेले आहेत.

Sanjay Raut on Congress Sangli
“तुमची नौटंकी…”, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यानाच संजय राऊंताचा इशारा
Akola Lok Sabha
अकोल्यात तिरंगी लढतीचा फायदा कोणाला ?
maval lok sabha
अखेर मावळमधून शिवसेनेकडून खासदार श्रीरंग बारणे यांना उमेदवारी जाहीर
RSS claims of support to Congress in Lok Sabha elections
‘आरएसएस’चा लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला पाठिंब्याचा दावा, जाणून घ्या सविस्तर…

हेही वाचा >>> पुणे : नागरी सहकारी बँकांसाठी आता शिखर संस्था; मुख्य कार्यकारी अधिकारीपदी खिरवडकर

सन २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ यांना मावळ मधून उमेदवारी देण्यात आली होती. मात्र बारणे यांनी त्यांचा मोठ्या फरकाने पराभव केला होता. आगामी लोकसभा निवडणूकही पार्थ पवार हे मावळमधून लढतील, अशी चर्चा राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांमध्ये आहे. मात्र, पार्थ पवार यांच्याबरोबरच माजी मंत्री सुनील तटकरे यांची कन्या आदिती आणि मावळचे विद्यमान आमदार सुनील शेळके यांची नावेही चर्चेत आहेत. त्यामुळे या मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेसने दावा केला आहे.

हेही वाचा >>> पिंपरी-चिंचवड महापालिकेची विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षात गिफ्ट; शालेय साहित्यासाठी मिळणार ‘एवढी’ रक्कम

मावळ मतदारसंघातून शिवसेनेच्या उमेदवाराला सातत्याने निवडून देण्यात आले आहे. विद्यमान खासदार श्रीरंग बारणे शिंदे गटात गेल्याने ठाकरे गटाकडे सक्षम उमेदवार नाही, असा दावाही राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे. मावळ लोकसभा मतदारसंघाचा विचार करता पिंपरी आणि मावळ विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन आमदार आहेत. त्या तुलनेत ठाकरे गटाची या मतदारसंघात कोणतीही ताकद नाही. चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीतही राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नाना काटे यांनी लाखाहून अधिक मते घेतली होती, असे राजकीय गणितही मांडण्यास सुरुवात झाली आहे.

हेही वाचा >>> रिंगरोड सुसाट…,जाणून घ्या कशी फुटणार पुण्याची वाहतूक कोंडी

पुणे लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद काँग्रेसपेक्षा जास्त आहे, असे सांगत अजित पवार यांनी पुणे लोकसभेच्या जागेवर दावा केला होता. त्यावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे. पुणे लोकसभा मतदारसंघातून कोण लढणार, याचा निर्णय महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते घेतील, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे. आता पुण्याबरोबरच मावळ लोकसभा मतदारसंघावरूनही महाविकास आघाडीत तिढा निर्माण होण्याची शक्यता आहे.