scorecardresearch

पुण्यात महागाईच्या मुद्द्यावर राष्ट्रवादी आक्रमक, स्मृती इराणींच्या गाडी ताफ्यावर अंडी, बांगड्या फेकण्याचा प्रयत्न

केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेत्या स्मृती इराणी सोमवारी (१६ मे) पुणे दौर्‍यावर असताना काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून आंदोलन करण्यात आले.

Smriti Irani Eggs Pune

केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेत्या स्मृती इराणी सोमवारी (१६ मे) पुणे दौर्‍यावर असताना काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून महागाईच्या मुद्द्यावर आक्रमक आंदोलन करण्यात आले. त्याच दरम्यान स्मृती इराणी यांचा गाड्यांचा ताफा जात असताना त्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या विशाखा गायकवाड यांच्याकडून अंडे फेकण्याचा प्रयत्न केला गेला. या प्रकरणी डेक्कन पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे.

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचे आज पुण्यात दोन कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. स्मृती इराणी पुण्यात येणार असल्याची माहिती काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना मिळाली. यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दुपारी चार वाजता सेनापती बापट रोडवरील एका हॉटेलमध्ये स्मृती इराणी यांचा कार्यक्रम सुरू असताना वाढत्या महागाई विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केले.

या आंदोलकांनी हॉटेलमध्ये जाऊन स्मृती इराणी यांना निवेदन देणार असल्याचे पोलिसांना सांगितले. मात्र, आक्रमक कार्यकर्ते लक्षात घेता त्या सर्वांना आतमध्ये प्रवेश दिला नाही आणि त्या सर्वांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यानंतर बालगंधर्व रंगमंदिर येथील अमित शाह आणि भाजपाची वाटचाल या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याला स्मृती इराणी हॉटेलमधून रवाना झाल्या. त्यांच्या जाणार्‍या मार्गावर कोणतीही अनुचित घटना घडू नये हे लक्षात घेता चोख बंदोबस्त ठेवण्यात आला.

चोख पोलीस बंदोबस्तामध्ये कार्यक्रम सुरू झाला, पण बालगंधर्व रंगमंदिर येथील बाल्कनीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या वैशाली नागवडे तीन महिला कार्यकर्त्यांसह आल्या. तेवढ्यात तेथील कार्यकर्त्यांनी याबाबतची माहिती पोलिसांना दिली.

पोलिसांनी कार्यक्रमामध्ये गोंधळ होऊ नये म्हणून वैशाली नागवडे यांच्यासोबत आलेल्या तीन महिलांना बाहेर काढलं. त्यांना बाहेर काढताना भाजपाच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. यावेळी काहीवेळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली. याचवेळी आरोपी भाजपा कार्यकर्ते भस्समराज तिकोणे याने वैशाली नागवडे यांच्या कानाखाली मारली.

या घटनेची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना मिळताच सर्वांनी डेक्कन पोलीस स्टेशनकडे धाव घेतली. तसेच मारहाण करणार्‍या व्यक्तीवर तातडीने कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी करीत रस्त्यावर आंदोलन केले.

हेही वाचा : “मोदींना रशिया-युक्रेनच्या युद्धाची चिंता, मात्र देशात जनता…”, संजय राऊतांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल

ही घटना थांबत नाही तोवर बालगंधर्व रंगमंदिर येथील स्मृती इराणी यांचा कार्यक्रम झाल्यावर त्यांच्या गाड्यांचा ताफा जात असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या विशाखा गायकवाड यांनी अंडे फेकण्याचा प्रयत्न केला. यानंतर पोलिसांनी विशाखा गायकवाड आणि त्यांच्या सोबत असलेल्या एका मुलाला ताब्यात घेतले असून चौकशीसाठी सुरू आहे.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ncp congress protest against inflation amid central minister smriti irani pune tour pbs

ताज्या बातम्या