पुणे : जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत ७३ पैकी ५२ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेसने बालेकिल्ल्यात अपेक्षित वर्चस्व राखले आहे. या निवडणुकीत काँग्रेसला एकाही जागावर विजय मिळाला नसल्यामुळे काँग्रेस जिल्ह्यातून हद्दपार झाल्याचे चित्र आहे. भारतीय जनता पक्षाला दहा, शिवसेना (शिंदे) पाच, शिवसेना (ठाकरे) सहा आणि राष्ट्रवादी काँग्रेसला (शरद पवार) एक जागा मिळाली आहे. या निवडणुकीत अनेक दिग्गजांना पराभवाचा सामना करावा लागला असून, नवख्या उमेदवारांनी जिल्हा परिषदेत प्रवेश केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने मावळ, बारामती आणि वेल्हे या तीन तालुक्यांत जिल्हा परिषदेच्या सर्वच्या सर्व जागा जिंकल्या आहेत.

जिल्हा परिषदेच्या ७३ गटांसाठी २९९ तसेच पंचायत समितीच्या १४६ जागांसाठी ५२८ उमेदवार रिंगणात उतरले होते. या निवडणुकीसाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी झाली होती. जिल्ह्यात अनेक ठिकाणी राष्ट्रवादी विरुद्ध भाजप असेच लढतीचे चित्र होते. तर, काही ठिकाणी राष्ट्रवादी विरुद्ध भाजप-सेना अशाही लढती झाल्या. या निवडणुकीत भाजपला गेल्या निवडणुकीच्या तुलनेत तीन जागा जास्त मिळाल्या आहेत.

जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत यंदा जुन्नरमधील सावरगाव गटातून पाच वेळा निवडून आलेल्या ज्येष्ठ सदस्या आशा बुचके यांचा पराभव झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे भोर उत्रोली गटातून माजी उपाध्यक्ष रणजित शिवतरे, चंद्रकांत बाठे, शिरूरमधून रेखा बांदल यांना पराभव स्वीकारावा लागला आहे. ज्येष्ठ सदस्यांपैकी वीरधवल जगदाळे, विवेक वळसे पाटील, स्वाती पाचुंदकर, सुजाता पवार, अमोल नलावडे, विक्रम खुटवड, गुलाब पारखे, मोनिका हरगुडे, तनुजा घनवट, शांताराम इंगवले, अंकिता हर्षवर्धन पाटील विजयी झाले आहेत.

माजी आमदार अशोक पवार यांच्या पत्नी सुजाता पवार, दिलीप वळसे पाटील यांचे पुतण्या विवेक वळसे पाटील, माजी आमदार रमेश थोरात यांचे चिरंजीव तुषार थोरात, माजी आमदार काशीनाथ खुटवड यांचे चिरंजीव विक्रम खुटवड हे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत निवडून आले आहेत. त्याशिवाय, वडगाव शेरीचे आमदार बापू पठारे यांच्या दोन्ही कन्या दीपाली गव्हाणे, रुपाली झेंडे यासुद्धा निवडून आल्या आहेत.

माजी आमदार पोपटराव गावडे यांचे चिरंजीव राजेंद्र गावडे आणि माजी आमदार विलास लांडे यांची कन्या खेडमधून विनया मुंगसे आणि माजी आमदार संग्राम थोपटे यांच्या पत्नी स्वरुपा विजयी झाल्या असून, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शरद बुट्टे पाटील यांच्या पत्नी सुनीता, तसेच माजी अध्यक्ष देवराम लांडे यांची सून मोनिका लांडे, शिवसेनेचे माजी सदस्य देविदास दरेकर यांच्या पत्नी सुवर्णा आणि पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ. दिगंबर दुर्गाडे यांची कन्या प्राजक्ता, तसेच जिल्हा बँकेचे संचालक अप्पासाहेब जगदाळे यांचे चिरंजीव यशराज जिल्हा परिषदेच्या सभागृहात पहिल्यांदाच पाऊल टाकणार आहेत.

पुणे जिल्हा परिषद

एकूण जागा – ७३

  • राष्ट्रवादी काँग्रेस – ५१
  • राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) -१
  • भाजप -१०
  • शिवसेना (शिंदे) – ५
  • शिवसेना (उद्धव ठाकरे) – ६
  • काँग्रेस – ०