पक्षाच्या विरोधात असणाऱ्या नगरसेवकांवर कारवाईची भाषा राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष योगेश बहल यांनी सुरू करताच, पक्षातील गटबाजी ऐन निवडणुकीत उफाळून आली आहे. चिंचवड विधानसभेचे राष्ट्रवादीचे उमेदवार नाना काटे हे लादलेले आणि शिवसेनेने नाकारलेले आहेत, असा मुद्दा उपस्थित राष्ट्रवादीच्या नऊ नगरसेवकांनी केला आहे. अनधिकृत बांधकामे, शास्तीकर, एलबीटीसारखे महत्त्वाचे प्रश्न राष्ट्रवादीने सोडवले नाहीत म्हणून मतदारांमध्ये तीव्र नाराजी आहे, त्यामुळे राष्ट्रवादीचा प्रचार करणे अवघड असल्याचा पवित्रा घेत या नगरसेवकांनी नेतृत्वापुढे अडचण निर्माण केली आहे.
नगरसेवक नवनाथ जगताप, राजेंद्र जगताप, शत्रुघ्न काटे, विनायक गायकवाड, शेखर ओव्हाळ, रामभाऊ बोकड, सोनाली जम, सुषमा तनपुरे, माया बारणे, शिक्षण मंडळाच्या उपसभापती सविता खुळे, सदस्य चेतन भुजबळ, नाना शिवले यांनी याबाबतचे संयुक्त निवेदन प्रसिध्दीस दिले आहे. शिवसेनेकडून इच्छुक असलेल्या नाना काटे यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे मुलाखत दिली होती. मात्र, सेनेने काटेना उमेदवारी नाकारली. राष्ट्रवादीने त्याच काटेंना उमेदवारी देऊन आमच्यावर लादले आहे. सत्ता असूनही राष्ट्रवादीने अनधिकृत बांधकामे, एलबीटी व शास्तीकराचा प्रश्न न सोडवल्याने मतदारांमध्ये तीव्र रोष आहे. परिणामी, राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा प्रचार करणे अवघड होऊन बसले आहे.
विशेष म्हणजे, हे नगरसेवक माजी आमदार लक्ष्मण जगताप यांचे समर्थक आहेत. जगताप भाजपमध्ये गेले असले तरी त्यांचे बहुतांश समर्थक राष्ट्रवादीतच आहेत. जगताप समर्थकांनी काटे यांचे काम करावे, अन्यथा कारवाई करण्याचा इशारा शहराध्यक्ष बहल यांनी दिल्यानंतर त्यास प्रत्युत्तर म्हणून ही खेळी करण्यात आल्याचे मानले जात आहे.
लांडे, बनसोडे यांच्या पराभवासाठी राष्ट्रवादीतच फिल्डिंग
भोसरीत आमदार विलास लांडे यांच्या विरोधात स्थायी समितीचे अध्यक्ष महेश लांडगे यांनी बंडखोरी केली आहे. मात्र, अजितदादांनी त्यांच्याविषयी काहीच भाष्य केले नाही. याशिवाय, लांडे यांचे पक्षांतर्गत विरोधक लांडगे यांच्या पाठिशी आहेत. पिंपरीचे उमेदवार अण्णा बनसोडे यांना घरी बसवण्यासाठी राष्ट्रवादीच्याच ज्येष्ठ नेत्यांनी फिल्डींग लावली असून शिवसेनेशी संधान बांधले आहे.