राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल आंदोलनाच्या समारोपाच्या कार्यक्रमात विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी भाजपावर कडाडून टीका केली. भाजपाच्या संपर्क फॉर समर्थन या अभियानाची त्यांनी आपल्या भाषणात चांगलीच खिल्ली उडवली. पेट्रोल-डिझेलचे दर वाढल्याचा परिणाम माधुरी दीक्षितवर होणार आहे का, गॅस सिलिंडरचे दर चार रूपयांनी वाढल्याचा फरक माधुरी दीक्षितवर होणार आहे का, असा सवाल करत ते माधुरी दीक्षितकडे गेले तर आपण मजुरांकडे जाऊ. ते टाटांकडे गेले तर आपण बाटा घालणाऱ्या सामान्य माणसाकडे जाऊ. ते कपिल देवकडे गेले तर आपण बळीदेवाकडे जाऊ, असे वक्तव्य त्यांनी व्यासपीठावरून केले.

राष्ट्रवादी काँग्रेसचा १९ वा वर्धापन दिवस तसेच हल्लाबोल आंदोलनाच्या समारोपानिमित्त पुण्यात मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात मुंडे यांनी आपल्या चिरपरिचित शैलीत भाजपावर हल्लाबोल केला. आपल्या घणाघाती भाषणात त्यांनी राज्य सरकारवरही टीका केली. छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन सत्तेवर आलेल्या भाजपाला सहा जूनला महाराजांच्या राज्याभिषेकाचाही विसर पडल्याची टीका त्यांनी केली. मुंडे यांच्या भाषणाला उपस्थितांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

भाजपची अपयशाची गाथा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवू. त्यांना आरक्षणाचा विसर पडला आहे. मराठा आरक्षणाचा विषय आला की छत्रपती शिवाजी महाराज यांचा मुद्दा काढला जातो. धनगर आरक्षणाचा विषय आला की विद्यापीठाला नाव देण्याचा विषय पुढे केला जातो. आता स्वस्थ बसायचं नाही, पेटून उठायचं. स्थापना दिवस हाच परिवर्तन दिवस असेल, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

यावेळी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, छगन भुजबळ, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, धनंजय मुंडे, सुनील तटकरे, माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख आदी उपस्थित आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील विविध भागातून मोठ्याप्रमाणात राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते कार्यक्रमस्थळी आले आहेत.