भाजपा आणि संघप्रणित नवपेशवाईला गाडून टाका- उर्जामंत्री नितीन राऊत

लोकशाही मूल्य जपणाऱ्या लोकांनी एकत्र येऊन समस्यांचे समूळ उच्चाटन करण्याचं केलं आवाहन

नवीन वर्षात नवपेशवाईला गाडून टाका असे आवाहन राज्याचे उर्जामंत्री डॉ नितीन राऊत यांनी शौर्यदिनी (१ जानेवारी) केले. पुणे येथील पंचशील चौकात शहर काँग्रेस कमिटीने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. १ जानेवारी म्हणजेच शौर्य दिनी भल्या पहाटे भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाला डॉ. नितीन राऊत यांनी अभिवादन केले. त्यानंतर पंचशील चौकातील माता रमाई आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्यांनी अभिवादन केले. यावेळी पुणे शहर काँग्रेस कमिटीला संबोधित करताना डॉ राऊत यांनी भाजपा व राष्ट्रीय स्वयंसेवक संघप्रणित नवपेशवाईवर टीका केली.

‘शिवशाही’ कॅलेंडरवर उर्दू भाषेतील मजकूर; हिरव्या रंगात इस्लामिक महिन्यांची नावं…

“२०० वर्षांपूर्वी व्यापाऱ्यांनी व भांडवलदारांनी पेशवाईचा पराभव केला. हे लक्षात ठेवून ही नवी पेशवाई भांडवलदारांशी जिगरी मैत्री करतेय. त्यांच्या मांडीवर बसून देशावर राज्य करतेय. राजेशाहीच्या काळात एखाद्या वारसाला वा दत्तकाला गादीवर बसवून राज्य कारभार चालवला जायचा. तसेच सध्या नरेंद्र मोदींना पंतप्रधान पदाच्या गादीवर बसवून भांडवलदार राज्य करीत आहेत. नवपेशवाई आपली नाकेबंदी करू पाहतंय, मनुस्मृती लादून पुन्हा युद्धकैदी करू पाहतंय. हे होऊ न देण्याचा संकल्प करा. देशातील तमाम धर्मनिरपेक्ष, समता व लोकशाही मूल्य जपणाऱ्या लोकांना एकत्र येऊन नवपेशवाईचे समूळ उच्चाटन करा”, असं आवाहन त्यांनी केलं.

‘हिंदुहृदयसम्राट ते ‘जनाब बाळासाहेब ठाकरे’…; ‘शिवशाही’च्या उर्दू कॅलेंडरवरून उद्धव यांना टोला

“भारतातील पश्चिम विभाग म्हणजेच वेस्टर्न इंडियामध्ये महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड व गोवा या राज्यांचा समावेश होतो. सध्या गरिबांना, शेतकऱ्यांना देशोधडीला लावून ज्यांच्या हितासाठी मोदी सरकार काम करतंय ते सारे उद्योगपती म्हणजे एका अर्थाने ‘वेस्टर्न इंडिया कंपनी’ आहेत. हे उद्योगपती व त्यांची वेस्टर्न इंडिया कंपनी ही भारताला गुलाम करणाऱ्या ईस्ट इंडिया कंपनीचे जुळे बंधू आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला अपेक्षित असलेले हिंदूराष्ट्र म्हणजे भांडवलदारांच्या नफेखोरीसाठीचे राष्ट्र, असे आता म्हणावे लागतेय. या ‘वेस्टर्न इंडिया’ कंपनीमुळे व तिच्या मांडलिक बगल बच्च्यांमुळे आज शेतकऱ्यांना कडाक्याच्या थंडीत रस्त्यांवर उतरावे लागले आहे. समतेसाठी व आपल्या हक्कासाठी लढणारे विचारवंत, बुद्धिजीवी, कामगार व शेतकरी यांना अतिरेकी व नक्षलवादी म्हणून छळ व हेटाळणी संघ व भाजपा करत आहे”, असा आरोप त्यांनी केला.

“अजितदादा, एक तर तुम्ही माझ्या घरी या किंवा मी तुमच्या घरी येतो….”

“१ जानेवारी १८१८ रोजी भीमा कोरेगाव येथे दुसरे बाजीराव पेशवे आणि ब्रिटिश सैनिकांच्या युद्धात ब्रिटीशांनी पेशव्यांच्या खूप मोठ्या सैन्याचा पराभव केला. जातीयवादी पेशव्यांनी महार समाजावर यांच्यावर अत्याचार केल्याने महार व मराठा सैन्यानी हौतात्म्य पत्करून पेशवाई नष्ट केल्याने बाबासाहेबांनी या घटनेला खूप महत्त्व दिले. लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी समतेची व समाज परिवर्तनाची लढाई अहिंसक पद्धतीने लढणे हीच भीमा कोरेगाव शहिदांना खरी श्रद्धांजली असेल”, असेही डॉ. राऊत म्हणाले.

“महापौरांच्या मुलाला आणि जावयाला किती मिळाले?”; आशिष शेलारांचा खोचक सवाल

“ही लढाई महार समाजाची मराठ्यांविरुद्धची लढाई कधीच नव्हती. महार आणि मराठा यांच्यात मतभेद किंवा संघर्षही कधीच नव्हता. इतिहासात अशा वादावादाची उदाहरणंही नाहीत. पेशव्यांनी अस्पृश्यतेची अमानवीय प्रथा बंद केली असती आणि शिवरायांच्या पद्धतीने राज्य कारभार केला असता तर ही लढाई कदाचित झालीच नसती”, असं मत त्यांनी मांडलं. राऊत यांनी आज माता रमाई यांच्या पुतळ्याला पंचशील चौक येथे प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करणारे विठ्ठल गायकवाड यांचा डॉ राऊत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Ncp leader maharashtra minister dr nitin raut slams bjp rss at pune vjb

ताज्या बातम्या