पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या गटनेतेपदी जेष्ठ नगरसेवक भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा गटनेता विरोधी पक्षनेता असणार आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांनी प्रतिष्ठेची केली हाेती. त्यांनी स्वतः उमेदवार ठरविण्यापासून प्रचाराची धुरा सांभाळली. महापालिकेतील कथितभ्रष्टाचारावरुन भाजपच्या स्थानिक नेत्यांना लक्ष्य केले होते. परंतु, राष्ट्रवादी काँग्रेसला अपयश आले. या पक्षाचे ३७ नगरसेवक निवडून आले. राष्ट्रवादी काँग्रेस दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. त्यामुळे या पक्षाचा गटनेता विरोधी पक्षनेता असणार आहे.
या पदासाठी माजी विराेधी पक्षनेते भाऊसाहेब भाेईर यांच्यासह प्रभाग क्रमांक २० मधील चारही नगरसेवक निवडून आणणारे पॅनेल प्रमुख संदीप वाघेरे, माजी महापाैर वैशाली घाेडेकर इच्छुक होते. चुकीच्या कामाविराेधात बाेलणारा आणि आक्रमक चेहरा विराेधी पक्षनेते पदासाठी देणार असल्याचे संकेत उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांनी दिले होते. अजित पवार यांचे विमान अपघातात अकाली निधन झाले. त्यामुळे गटनेता नोंदविण्याची प्रक्रिया रखडली होती.
प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या सूचनेनुसार भोईर यांची नियुक्ती
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडे गटनेता पदासाठी इच्छुकांची नावे पाठवली होती. तटकरे यांनी जेष्ठ नगरसेवक भाऊसाहेब भोईर यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. त्यानुसार शहराध्यक्ष योगेश बहल यांनी भाऊसाहेब भोईर यांची गटनेतेपदी नियुक्ती करण्यात आल्याचे पत्र विभागीय आयुक्तांना दिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची आज नोंदणी केली जाणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा गटनेता विरोधी पक्षनेता असणार आहे. त्यामुळे भोईर दुसऱ्यांदा विरोधी पक्षनेते होणार आहेत.
एक आमदार, ३७ नगरसेवक
महापालिकेत सत्ता नसली तरी शहरात राष्ट्रवादी काॅंग्रेसची ताकद आहे. नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत ३७ नगरसेवक निवडून आले. ७६ उमेदवारांनी दुसऱ्या क्रमांकाची मते घेतली. त्यामुळे शहरात संघटना मजबुत आहे. पिंपरीचा आमदार पक्षाचा आहे. तीन नामनिर्देशित (स्वीकृत) नगरसेवक हाेणार आहेत.

