पुणे : लोकसभेच्या निवडणुकीत पक्षाला जास्त जागा मिळायला हव्या होत्या. मात्र, महाविकास आघाडीत एकी राहण्यासाठी एक पाऊल मागे घेतले, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केले. आता आगामी विधानसभा निवडणुकीतून आपल्याला राज्य हातात घ्यायचे आहे. त्यासाठी तयारीला लागण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना करून विधानसभेला जास्त जागांसाठी आग्रही असल्याचे संकेत पवार यांनी दिले.

बारामती दौऱ्यानंतर पवार दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर आहेत. शुक्रवारी त्यांनी निसर्ग मंगल कार्यालयात पक्षाची बैठक घेतली. बैठकीला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार यांच्यासह पक्षाचे नवनिर्वाचित आठ खासदार उपस्थित होते. त्या वेळी पवार बोलत होते.

हेही वाचा : राज्यात ७८ तालुक्यांत अत्यल्प पाऊस, अवघ्या २४ टक्के क्षेत्रावर पेरणी

पवार म्हणाले, की लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या जागावाटपात पक्षाला जास्त जागा मिळणे आवश्यक हाते. मात्र, आघाडीची एकी कायम राहण्यासाठी दोन पावले मागे घेण्यात आली. एकत्रित राहिल्यामुळे लोकसभा निवडणुकीत यश मिळू शकले. आता राज्य हातात घेण्यासाठी विधानसभा निवडणुकीच्या कामाला सर्वांनी लागले पाहिजे.

हेही वाचा : Porsche Car Accident : पोर्श कार अपघात प्रकरणातील आरोपीच्या वडीलांना जामीन मंजूर, पण तरीही कोठडीतच राहावं लागणार

आघाडीमध्ये विसंवाद होऊ नये, यासाठी लोकसभा निवडणुकीत कमी जागांवर समाधान मानावे लागले. विधानसभा निवडणुकीत आम्हाला जास्त जागा मिळण्याची अपेक्षा असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले. दरम्यान, शनिवारी यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने देण्यात येणाऱ्या ‘यशस्विनी सन्मान’ पुरस्कारांचे वितरण पवार यांच्या हस्ते होणार आहे.