पुणे : काँग्रेस पक्षामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे विलीनीकरण करण्याची कोणतीही चर्चा नाही. शिवसेना (ठाकरे) पक्ष फुटल्यानंतर अशा चर्चा सुरु झाल्या. विरोधी पक्षांना अस्थिर करण्यासाठी व विरोधी पक्षातील एकसंघता तोडण्यासाठी अशा अफवा जाणीवपूर्वक पसरविल्या जात असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी शनिवारी स्पष्ट केले.

पक्षाच्या पुणे, पिंपरी-चिंचवड तसेच जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांची बैठक प्रदेशाध्यक्ष शिंदे यांच्या उपस्थितीत झाली. त्यानंतर शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पक्षाचे शहराध्यक्ष श्रीकांत पाटील, प्रवक्ते अंकुश काकडे, यावेळी उपस्थित होते. राज्यात सत्ताधारी असलेल्या भाजपबरोबर जाण्याची मागणी करणारा तसेच पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्याचा आग्रह धरणारा, असे दोन मतप्रवाह राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षात निर्माण झाले आहेत का? या प्रश्नाला उत्तर देताना शिंदे म्हणाले, अशी कुठलीही चर्चा झालेली नाही. अधिवेशनापासून या बातम्या पेरल्या जात आहेत. सध्याच्या राजकीय घटना घडत आहेत, त्यामध्ये विरोधी पक्ष म्हणून आम्ही काम करणार आहोत.

अयोध्येतील राम मंदिरातील देणगी चोरीच्या घटनेवर शिंदे यांनी टीका केली. ‘राम, मंदिर व धर्माच्या नावाखाली सत्ता घेऊन पैसा कमविण्याचा प्रकार सुरु आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही त्यावर टीका केली आहे. त्यामुळे राम मंदिराच्या देणग्या गेल्या कुठे ? चोरी केलेल्या देणग्यांचा कोणत्या पक्षाने वापर केला आहे का? असे प्रश्न उपस्थित होत आहे.नाशिकच्या कुंभमेळ्यातही रस्ते बांधकामात २३०० कोटी रूपयांचा घोटाळा झाल्याचे विधीमंडळात प्रश्न आला होता. या प्रकारामुळे रामभक्त तसेच हिंदूमध्ये मोठी नाराजी आहे. आम्ही देखील याविरोधात आंदोलन करणार आहोत. भाजपची सत्ता सर्वत्र असूनही निकृष्ट दर्जाची कामे होत आहेत. कंत्राटदारांना पाठीशी घालण्याचे काम सरकार करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

मिसिंग लिंकवरील काम निकृष्ट

नव्याने उभारलेल्या मिसिंग लिंकच्या रस्त्यावर खड्डे पडण्यास सुरुवात झाली आहे. या मिसिंग लिंकवरील निकृष्ट दर्जाच्या कामासह राज्यात सत्ताधारी महायुती सरकारच्या माध्यमातून सुरू असलेल्या विविध विकासकामांच्या दर्जावरही शशिकांत शिंदे यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “यांची सर्वत्र सत्ता असूनही निकृष्ट दर्जाची कामे होत आहेत. कंत्राटदारांना पाठीशी घालण्याचे काम सरकार करत असून, सार्वजनिक निधीचा योग्य वापर होत नाही, राज्यात ठराविक कंत्राटदारांची साखळी सक्रीय असल्याचा आरोप देखील शिंदे यांनी केला. .

शिंदे म्हणाले…

  • पक्षाचे आमदार, खासदार १५ ऑगस्टपासून राज्यव्यापी दौरे करणार
  • राज्य व जिल्हा कार्यकारिणीमध्ये बदल करून आक्रमकपणा पुढे आणणार
  • शरद पवार, सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली काम करू असे अमोल कोल्हेंनी सांगितले.
  • कलाकारांपासून आमदारांपर्यंत खंडणीचे प्रकार, गृहखाते व पोलिसांचा वचक संपला