पुणे : विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या काळात आजही समाजातील अनेक घटक भोंदू बाबांच्या नादी लागत असल्याचे प्रकार समोर आले आहेत. पुरोगामी महाराष्ट्रासाठी हा प्रकार अत्यंत दुर्दैवी असून याबाबत जनजागृती करण्याचा संकल्प राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार पक्षाने केला आहे. या जनजागृतीची सुरुवात महात्मा फुले वाडा समता भूमी येथून करण्यात आली.

नाशिक येथील कॅप्टन अशोक खरात या भोंदू बाबाने असंख्य महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात तपास करत पोलिसांनी मुख्य आरोपी अशोक खरात याला अटक केली आहे. समाजात अशा प्रकारचे अनेक भोंदू बाबा वावरत असून नागरिक आणि विशेषतः महिला वर्ग या भोंदू बाबांच्या आमिषांना बळी पडत असल्याचे दिसून आले आहे. या भोंदू बाबाच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर भोंदू बाबांच्या प्रवृत्तींना आळा घालून महिलांमध्ये याबाबत जनजागृती करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाने महिला जनजागृती अभियान सुरू केले आहे.

गंज पेठेतील महात्मा फुले वाडा येथे शपथ घेऊन या अभियानाची सुरुवात करण्यात आली. पक्षाचे शहराध्यक्ष श्रीकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हे अभियान सुरू करण्यात आले आहे. ‘अंधश्रद्धेला सोडा, विज्ञानाची धरा कास’ असा मंत्र या जनजागृती अभियानामध्ये देण्यात आला. यावेळी समाजात भोंदू बाबांकडून महिलांचे होणार्‍या लैंगिक शोषणाविरोधात लढा उभारण्याच्या दृष्टीने उपस्थित पदाधिकाऱ्यांना शपथ देण्यात आली.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार) पक्षाचे पुणे शहर अध्यक्ष श्रीकांत पाटील, युवक शहर अध्यक्ष किशोर कांबळे, युवती अध्यक्ष श्रद्धा जाधव, कार्याध्यक्ष पायल चव्हाण यांच्यासह पक्षाच्या अनेक आजी- माजी महिला पदाधिकारी, कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. शहराध्यक्ष श्रीकांत पाटील म्हणाले, नाशिक येथील कॅप्टन अशोक खरात या भोंदू बाबा ने एका महिलाचे लैंगिक शोषण केल्याचा व्हिडीओ समोर आला. त्यानंतर अशोक खरात या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

या प्रकरणात मुख्य आरोपी असलेल्या अशोक खरात याच्या ट्रस्टवर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर या विश्वस्त म्हणून होत्या. त्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी करून या मध्ये जे दोषी असतील, त्या प्रत्येक व्यक्तीवर गृह खात्याने कारवाई केली पाहिजे,अशी आमची भूमिका आहे. या गंभीर प्रकरणातील सर्व दोषींवर कडक कारवाई व्हावी, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्ष पाठपुरावा करणार असल्याचेही पाटील यांनी स्पष्ट केले.

नाशिक येथे झालेल्या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी आणि महिलांमध्ये भोंदू बाबांविषयी जागृती करण्यासाठीचा संकल्प पक्षाने केला आहे. याच पार्श्वभूमीवर राजकीय, सामाजिक जीवनात आपल्या सर्वांना काम करताना कायम ऊर्जा देणार स्थान म्हणजे महात्मा फुले वाडा आहे. येथील महात्मा फुले आणि सावित्री बाई फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून भोंदू बाबांच्या आहारी न जाण्याची शपथ घेतली आहे, असेही पाटील यांनी सांगितले.

राज्यभरातील कोणत्याही महिला वर्गाने अशा प्रकारच्या भोंदू बाबांना बळी पडता कामा नये. कोणत्याही भोंदू बाबा कडून आपली आणि आपल्या कुटुंबातील व्यक्तींची फसवणूक झाली असल्यास त्याच्या विरोधात जवळील पोलीस स्टेशन येथे तक्रार देण्यात यावी, असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले. यापुढील काळात देखील भोंदू बाबांच्या विषयी सुरू करण्यात आलेली ही जनजागृती मोहीम वेगवेगळ्या माध्यमातून सुरू राहणार असल्याचे श्रीकांत पाटील यांनी स्पष्ट केले.