राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे यांची बापट यांना श्रद्धांजली

सर्व राजकीय पक्ष, कार्यकर्त्यांशी मैत्रीपूर्ण संबंध कसे असावेत याचे आदर्श उदाहरण म्हणजे गिरीश बापट होते. पुण्यात त्यांची पोकळी भरून काढू शकणारा नेता आज भारतीय जनता पक्षाकडे नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी खासदार गिरीश बापट यांना श्रद्धांजली वाहिली.खासदार गिरीश बापट यांचे बुधवारी पुण्यात निधन झाले. बापट आणि काकडे यांची गेली चार दशके मैत्री होती. त्यामुळे काकडे यांनी बापट यांची कारकिर्द जवळून पाहिली आहे, त्यांच्यासह कामही केले आहे. या पार्श्वभूमीवर काकडे म्हणाले, की गेली चार दशके पुण्याच्या राजकारणात आणि समाजकारणात सक्रीय असणारा नेता पुणेकरांनी गमावला आहे. जनसंघापासून राजकीय जीवनात बापट यांची प्रवेश केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

त्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून महापालिका, विधानसभा, लोकसभेत बापट यांनी योगदान दिले. मंत्रीपदासह विविध जबाबदाऱ्या त्यांनी निभावल्या. त्यांचे योगदान पुणेकर विसरू शकणार नाहीत. ते त्यांच्या पक्षाशी सदैव एकनिष्ठ होते. १९८५पासून माझी आणि त्यांची मैत्री होती. आम्ही महापालिकेत एकावेळी काम केले. पण आमच्या मैत्रीत अंतर पडू दिले नाही. त्यांच्या निधनामुळे माझी वैयक्तिक हानी झाली आहे.

हेही वाचा >>>गिरीश बापटांच्या निधनाने सर्वसमावेशक नेतृत्व हरपलं, अजित पवारांनी व्यक्त केला शोक

गिरीश बापट यांच्या निधनाने महाराष्ट्राने एक सच्चा कार्यकर्ता गमावला. शाळेपासून आम्ही एकत्र होतो, ५८ वर्षांची ही आमची साथ संपली याचे फार दुःख होत आहे. आमदार, खासदार तसेच महापालिकेतील स्थायी समितीचे अध्यक्ष म्हणून उत्तम कामगिरी पार पाडली. सातत्याने पुण्याचे सर्व प्रश्न लावून धरले. आणिबाणीच्या लढाईपासून मोदी सरकारच्या वेगवेगळ्या जबबादाऱ्याही त्यांनी पार पाडल्या. त्यामुळे आज असंख्य आठवणी दाटून आल्या आहेत. मनःपूर्वक श्रद्धांजली..! – प्रकाश जावडेकर, खासदार

राज्याचे माजी मंत्री, विद्यमान खासदार गिरीश बापट यांचे निधन हे पुणे जिल्ह्यातल्या आम्हा सर्वपक्षीय राजकीय, सामाजिक कार्यकर्त्यांसाठी मोठा धक्का आहे. महाराष्ट्राचे सर्वसमावेशक, सुसंस्कृत राजकारणाचा चेहरा म्हणून गिरीशभाऊंकडे पाहिले जायचे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत तयार झालेल्या गिरीशभाऊंनी जात, धर्म, पंथ, प्रांत, भाषा, पक्षभेदांच्या भिंती ओलांडून समाजकार्य, विकासाचं राजकारण केले. टेल्को कंपनीतल्या कामगार नेत्यापासून सुरु झालेला त्यांचा प्रवास पुणे महापालिकेचे नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष, आमदार, मंत्री, खासदार पदापर्यंत पोहचला. चार दशकांच्या प्रदीर्घ राजकीय वाटचालीत गिरीशभाऊंना पुणेकरांचे अलोट प्रेम मिळाले. गिरीशभाऊंच्या निधनाने पुणे जिल्ह्याचे सर्वसमावेशक नेतृत्व हरपले आहे. आम्ही ज्येष्ठ सहकारी, सुहृदय मित्र गमावला आहे. पुणे जिल्ह्याला, राज्याला गिरीशभाऊंची उणीव कायम जाणवेल, त्यांची आठवण कायम येत राहील. अजित पवार, विरोधी पक्षनेते

हेही वाचा >>>“तुमच्या छत्रछायेत मी लहानाची मोठी झाले…” गिरीश बापट यांच्या निधनानंतर प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीची भावूक पोस्ट

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि पक्षनिष्ठ व्यक्तिमत्त्व खासदार गिरीश बापट यांचे निधन अतिशय दुःखद आहे. त्यांच्या जाण्याने पुणे आज पोरके झाले. बापट यांच्या सारख्या ज्येष्ठ आणि अनुभवी व्यक्तिमत्त्वाच्या जाण्याने पक्षाचा आधारवड हरपला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक, नगरसेवक, आमदार, खासदार आणि राज्याचे मंत्री अशा विविध जबाबदाऱ्या त्यांनी उत्तमरित्या पार पाडल्या. बापट यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाने ‘पुण्याची ताकद गिरीश बापट’ ही ओळख जनमानसात तयार केली होती. त्यांच्या जाण्याने आमचा मार्गदर्शक हरपला आहे.- चंद्रकांत पाटील, पालकमंत्री, पुणे जिल्हा

सर्व राजकीय पक्ष, कार्यकर्त्यांशी मैत्रीपूर्ण संबंध कसे असावेत याचे आदर्श उदाहरण म्हणजे गिरीश बापट होते. पुण्यात त्यांची पोकळी भरून काढू शकणारा नेता आज भारतीय जनता पक्षाकडे नाही. गेली चार दशके पुण्याच्या राजकारणात आणि समाजकारणात सक्रीय असणारा नेता पुणेकरांनी गमावला आहे. १९८५पासून माझी आणि त्यांची मैत्री होती. आम्ही महापालिकेत एकावेळी काम केले. पण आमच्या मैत्रीत अंतर पडू दिले नाही. त्यांच्या निधनामुळे माझी वैयक्तिक हानी झाली आहे.-अंकुश काकडे, प्रवक्ता, राष्ट्रवादी काँग्रेस</strong>

बापट यांचा गेल्या ४० वर्षांपासून राजकारणात दबदबा होता. त्यांच्याकडे पुण्याच्या विकासाची दृष्टी होती. आपल्या माणूसकी असलेल्या स्वभावाने त्यांनी अनेक माणसे जोडली. ते एका विशिष्ट पक्षाचे नेते असले, तरी बाकीच्या पक्षांच्या नेत्यांशीही त्यांचे चांगले संबंध होते. पुण्याचे प्रतिनीधी म्हणून ते लोकसभेत गेले, तिथेही त्यांनी आपल्या स्वभावाने छाप पाडली. त्यांनी कधीही कुणाशी वैर धरले नाही. दीड-दोन महिन्यापूर्वी मी त्यांच्याकडे गेलो होतो. अलीकडच्या राजकीय वातावरण अत्यंत द्वेषाचे झाले आहे. ते पाहताना खुप वाईट वाटते, अशी भावना त्यांनी व्यक्त केली होती. – उल्हास पवार, ज्येष्ठ काँग्रेस नेते

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp spokesperson ankush kakade paid tribute to mp girish bapat pune print news amy
First published on: 29-03-2023 at 16:29 IST