DCM Sunetra Pawar’s Delhi Tour: राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवार पहिल्यांदाच दिल्ली दौरा करणार आहेत. सुनेत्रा पवार दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार आहेत, अशी माहिती राजकीय सूत्रांकडून समोर आली आहे. अजित पवार यांचा बारामती येथे झालेल्या विमान अपघातात मृत्यू झाला. अजित पवारांच्या अकाली निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे.
राज्यसभेसाठी पार्थ नव्हे जय पवार यांची चर्चा?
सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेण्यापूर्वी राज्यसभेचा राजीनामा दिला आहे. सुनेत्रा पवार यांच्या जागी त्यांचे पूत्र पार्थ पवार यांची वर्णी लागण्याची चर्चा सुरु असताना यात मोठा ट्विस्ट आला आहे. पार्थ यांच्या ऐवजी आता जय पवार यांना राज्यसभेवर पाठवले जाऊ शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळातून समोर येत आहे. पार्थ राज्यसभेच्या सहा वर्षे कार्यकाळासाठी इच्छुक असल्याने जय यांच्या नावाचा विचार केला जात असल्याची चर्चा सुरु आहे.
सुनेत्रा पवार पुणे, बीडच्या पालकमंत्री
उपमुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर सुनेत्रा पवार यांच्याकडे पुणे आणि बीडच्या पालकमंत्रीपदाचीही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. राज्य सरकारने मंगळवारी (०३ फेब्रुवारी) याबाबत शासकीय निर्णय प्रसिद्ध करत घोषणा केली आहे. यापूर्वी पुणे आणि बीडच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी अजित पवारांकडे होती. धनंजय मुंडे यांच्या मंत्रीपदाच्या राजीनाम्यानंतर अजित पवारांनी बीडचे पालकमंत्रीपद स्वत:कडे घेतले होते.
शपथविधीच्या घाईवरुन राजकारण
सुनेत्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्रीपदाच्या शपथ विधीसाठी घाई करण्यात आली अशी टीका राजकीय क्षेत्रातून होत आहे. संजय राऊत, विजय वडेट्टीवार, संजय शिरसाट यासह विविध नेत्यांनी शपथविधीच्या घाईबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले. दरम्यान, जनतेची कामं पूर्ण करण्यासाठी आणि पक्षाला नेतृत्व आवश्यक असल्याने शपथविधी उरकला असे स्पष्टीकरण अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून दिलं जात आहे.
दोन्ही राष्ट्रवादीचे विलीनीकरण लांबणीवर
अजित पवार यांच्यासोबत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत अनेक बैठका झाल्या. जिल्हा परिषदांच्या निवडणुकांनंतर याबाबत घोषणा केली जाणार होती, असे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते सांगत आहेत. दरम्यान, अजित पवार गटाच्या नेत्यांकडून अशी कोणतीही चर्चा झाल्याचा दावा फेटाळला आहे. अशा कुठल्या प्रस्तावाबाबत अजित पवारांनी चर्चा केली नसल्याचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे म्हणाले आहेत. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या भवितव्यावर अनिश्चिततेचे सावट आहे.

