पुणे आणि पिंपरीत भाजप-शिवसेनेला झटका, राष्ट्रवादीची सरशी

पुणे महापालिकेच्या दोन प्रभागांतील पोटनिवडणुकीत सोमवारी राष्ट्रवादी कॉंग्रेसने बाजी मारली.

पुणे महापालिकेच्या दोन प्रभागांतील पोटनिवडणुकीत सोमवारी राष्ट्रवादी कॉंग्रेसने बाजी मारली. केळेवाडी-रामबाग प्रभागातून पक्षाचे दीपक मानकर यांनी तर काळेपडळ-महंमदवाडीमधून फारूख इनामदार यांनी विजय मिळवला. या दोन्ही पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी भाजपच्या उमेदवारांचा पराभव केला.
केळेवाडी-रामबागमधून भाजपचे दिलीप उंबरकर निवडणुकीच्या रिंगणात होते. मानकर यांनी त्यांचा ३०५४ मतांनी पराभव केला. फारूख इनामदार यांनी भाजपच्या जीवन जाधव यांचा २३८७ मतांनी पराभव केला. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या पोटनिवडणुकीत भाजपच्या राज्यस्तरीय नेत्यांनी आपल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मेळावेही घेतले होते. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी उंबरकर यांच्यासाठी मेळावा घेतला होता. यानंतरही भाजपच्या दोन्ही उमेदवारांचा पराभव झाला.
पिंपरीत शिवसेनेला धक्का
पिंपरी-चिंचवड महापालिकेतील जिजामाता प्रभागात झालेल्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार अरूण टाक यांनी रिपाई-भाजप युतीच्या अर्जुन कदम यांचा पराभव केला. या निवडणुकीत शिवसेनेचे आमदार गौतम चाबुकस्वार यांचे बंधू सुनील शिवसेनेचे उमेदवार होते. मात्र मतमोजणीमध्ये ते तिसऱया क्रमांकावरच राहिले. त्यामुळे आमदार चाबुकस्वार आणि शिवसेनेलाही मतदारांनी धक्का दिला आहे. अरूण टाक यांना २५७३, अर्जुन कदम यांना २११५ आणि सुनील चाबुकस्वार यांना १८३९ मते मिळाली आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Ncp wins byelection of pune pimpri chinchwad municipal corporation

Next Story
राष्ट्रवादीच्या पुणे शहराध्यक्षपदासाठी काकडे, निकम, पाटील यांची चर्चा
ताज्या बातम्या