Rupali Thombare Patil Video: पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी मतमोजणी सुरू आहे. न्यू इंग्लिश स्कूल मतमोजणी केंद्रावर काही वेळ तणावाची परिस्थिती पाहायला मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील मोठ्या आक्रमक पाहायला मिळाल्या. मतमोजणी होत असताना ईव्हीएम मशीन बदलले गेल्याचा आरोप करत त्यांनी स्ट्राँगरुममध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. यावेळी जाळीवर चढण्याचा प्रयत्न करत असतानाचा त्यांचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

रुपाली ठोंबरे पुण्यातील प्रभाग क्र. २५ अ आणि २६ ब या दोन प्रभागातून निवडणूक लढवत होत्या. या दोन्ही ठिकाणी त्या पिछाडीवर आहेत. दरम्यान त्यांनी आरोप केला की, मतदानादिवशी वापरलेल्या ईव्हीएम मशीन आणि आज मतमोजणीसाठी आणलेल्या मशीनमध्ये तफावत आहे. प्रशासनाने जाणीवपूर्वक मशीन बदलल्या.

मशीन बदलल्याचा आरोप करत त्यांनी मतमोजणी केंद्रावर गोंधळ घातला. तसेच न्यू इंग्लिश स्कूलमधील सुरक्षा जाळीवर चढून स्ट्राँगरुममध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. त्यांचा हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

रुपाली ठोंबरे पाटील काय म्हणाल्या?

मुंबई तकशी बोलताना रुपाली ठोंबरे पाटील म्हणाल्या, “निवडणूक प्रक्रिया पारदर्शकपद्धतीने पार पडण्यासाठी आम्ही काही तांत्रिकबाबींचे आक्षेप घेतले आहेत. मी उमेदवार आहे. निवडणूक आयोगाने आम्हाला ईव्हीएमचे नंबर दिले होते, त्यात त्यांची सही आणि शिक्काही होता. मतदान झालेले आणि मतमोजणीच्या टेबलावर आलेले मशीन वेगवेगळे होत्या. त्यामुळे आम्ही आक्षेप घेतला. एखादी मशीन मॅच झाली नाही, हे आम्ही समजू शकतो. पण १३ मशीन आम्हाला न सांगता बदलल्या कशा? त्याची यादी आम्हाला का दिली नाही?”

निवडणूक निर्णय अधिकारी निलेश काळे यांनी या प्रकरावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “प्रभाग क्रमांक २५ ची मतमोजणी सुरू असताना काही उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींनी गोंधळ घातल्यामुळे मतमोजणी प्रक्रिया काही काळासाठी थांबविण्यात आली. काही उमेदवार व प्रतिनिधींचा असा आक्षेप होता की उमेदवारांकडे असलेल्या यादीतील मतदान यंत्रांचे क्रमांक व मतमोजणीसाठी वापरात असलेल्या मतदान यंत्रांचे क्रमांक परस्परांशी जुळत नव्हते.मतदान यंत्रांच्या क्रमांकांबाबत उमेदवारांकडील यादीच्या आधारे आक्षेप घेण्यात आला. या संदर्भात निवडणूक निर्णय अधिकारी श्री. निलेश काळे यांनी सर्व उपस्थितांच्या शंकांचे सविस्तर निरसन करताना उमेदवारांकडील यादी ही मूळ यादीशी क्रॉस-चेक केली असता असे स्पष्ट झाले की यादीतील माहिती अचूक असून प्रभाग क्रमांक २५ व २७ यांच्या यादीतील पानांची अदलाबदल ही उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींकडून झालेली होती. ही बाब लक्षात आल्यानंतर उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी यांचा सर्व शंका दूर झाल्या आणि त्यानंतर मतमोजणी प्रक्रिया पुन्हा सुरळीतपणे सुरू करून यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आली.