पुणे / जुन्नर : खोडद येथील अद्ययावत जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोपच्या (जीएमआरटी) साहाय्याने महत्त्वपूर्ण संशोधन खगोलशास्त्रज्ञांनी केले आहे. आपल्या आकाशगंगेतील अत्यंत प्राचीन मेसियर ६९ (एम६९) आणि मेसियर ७० (एम७०) या गोलाकार तारासमूहांमध्ये वेगाने फिरणाऱ्या पाच नवीन ‘मिलिसेकंद पल्सार’चा शोध लावण्यात आला आहे. या विशिष्ट तारासमूहांमध्ये मिलिसेकंद पल्सार आढळण्याची इतिहासातील ही पहिलीच वेळ असून, या शोधामुळे आकाशगंगेतील सर्वांत जुन्या आणि अथांग दाटीवाटीच्या ताराप्रणालींचा अभ्यास करण्यासाठी एक नवा मार्ग खुला झाला आहे.

पुण्यातील ‘नॅशनल सेंटर फॉर रेडिओ ॲस्ट्रोफिजिक्स’मधील (एनसीआरए) ज्योतिर्मय दास, डॉ. जयंत रॉय यांनी या बाबतचे संशोधन केले. या संशोधनाचा शोधनिबंध ‘द ॲस्ट्रोफिजिकल जर्नल’ या संशोधनपत्रिकेमध्ये प्रसिद्ध झाला. नव्या पाच मिलिसेकंद पल्सारचा शोध जर्मनी, अमेरिका, ब्रिटन, भारतातील शास्त्रज्ञांचा समावेश असलेल्या ‘ग्लोब्युलर क्लस्टर्स जीएमआरटी पल्सार सर्च’ (जीसीजीपीएस) या आंतरराष्ट्रीय सर्वेक्षणांतर्गत लावण्यात आला. पाच पल्सारपैकी दोन ‘एम-६९’ या तारासमूहात, तर ‘एम-७०’ या तारासमूहात तीन पल्सार आहेत.

संशोधनात खगोलशास्त्रज्ञांना ताऱ्यांच्या जीवनचक्रातील मोठे वैविध्य दिसून आले. नव्याने सापडलेल्या पाच पल्सारपैकी ‘एम-६९ए’ हा पल्सार विशेष लक्षवेधी आहे. तो एका श्वेतबटू ताऱ्याशी घट्ट जोडला गेला आहे. ते अवघ्या काही दिवसांत एकमेकांभोवती एक फेरी पूर्ण करतात. तर एम-७० सारख्या अत्यंत दाट तारासमूहात काही पल्सर ‘एकाकी’ असल्याचे आढळून आले. ताऱ्यांमधील हिंसक संघर्षामुळे मूळच्या जोड-तारे प्रणाली उद्ध्वस्त होऊन शेवटी वेगाने फिरणारा एकच तारा उरतो, अशी माहिती शास्त्रज्ञांनी दिली.

‘गोलाकार तारासमूह हे आपल्या आकाशगंगेतील सर्वांत जुन्या ताराप्रणालींपैकी एक आहेत. त्यांच्यामध्ये पल्सारचा शोध लागल्यामुळे आपल्याला या प्रणालींचा अत्यंत अचूकतेने अभ्यास करता येतो. त्यांच्या फिरण्याच्या स्थिर गतीमुळे समूहांमध्ये होणाऱ्या भौगोलिक किंवा वेळेच्या बदलांची माहिती मिळू शकते. एकाच समूहात अनेक पल्सार सापडल्यामुळे तेथील अंतर्गत बदलांचा स्वतंत्र आणि सूक्ष्मपणे वेध घेता येतो, असे ज्योतिर्मय दास यांनी सांगितले.

प्राचीन तारासमूह आपल्यापासून हजारो प्रकाश वर्षे दूर असून, आकाशात अतिशय लहान जागेत एकवटलेले आहेत. अद्ययावत ‘जीएमआरटी’मुळे त्या तारासमूहांवर लक्ष केंद्रित करणे शक्य झाले. अत्यंत आव्हानात्मक वातावरणातील दडलेले पल्सार शोधण्यासाठी अद्ययावत ‘जीएमआरटी’ ही जगातील सर्वांत शक्तिशाली दुर्बिणींपैकी एक आहे,’ असे डॉ. जयंत रॉय यांनी नमूद केले.

‘मिलिसेकंद पल्सार’ म्हणजे काय?
एखाद्या अवाढव्य ताऱ्याचा स्फोट झाल्यावर अवशेष मागे उरतात. त्यांना ‘न्यूट्रॉन तारे’ म्हणतात. कालांतराने हे मृत तारे आपल्या नजीकच्या ताऱ्याची ऊर्जा आणि द्रव्य खेचून घेऊन स्वतःभोवती सेकंदाला शेकडो वेळा फिरू लागतात. हे तारे अवकाशात एखाद्या दीपगृहाप्रमाणे रेडिओ लहरींचे झोत सोडतात. त्यांची फिरण्याची गती इतकी अचूक असते, की त्यांना ‘वैश्विक घड्याळे’ मानले जाते.