पुणे ः राष्ट्रीय संरक्षण प्रबोधनीच्या (एनडीए) १५० व्या तुकडीत दोन विद्यार्थ्यांनी उत्तुंग यश संपादन केले. एक शिक्षकाचा मुलगा, घरात कोणतीही लष्करी पार्श्वभूमी नसताना एनडीएत प्रवेश मिळवला. तर एकाने आयआयटीत प्रवेश मिळवून करोडोंचे पॅकेज कमावण्याची संधी सोडून एनडीएतल्या शिस्तीची निवड केली.
बी.एससी शाखेत प्रथम क्रमांक मिळवून ‘चीफ ऑफ आर्मी स्टाफ ट्रॉफी’ पटकावणारा छात्र पियुष रौतेला हा उत्तराखंडचा. ‘वडील प्राथमिक शाळेत गणिताचे शिक्षक, आई घरकाम करते. लहानपणापासूनच शिक्षकाचा मुलगा म्हणून अभ्यासात नेहमी अव्वल राहण्याचे दडपण होते. पण त्यातूनच आताच्या यशाचा पाया रचला गेला. प्राथमिक शिक्षण सैनिक शाळेत झाले. तिथल्याच अधिकाऱ्यांना पाहून लष्करात अधिकारी व्हायचे ठरवले. पण, एनडीएतले दिवस सोपे नव्हते. पहाटे पाच वाजल्यापासून पहाटे पाचपासून सुरू होणारा दिवस रात्री साडेदहा वाजता संपायचा. शरीर पूर्णपणे थकून जाते. त्याच अवस्थेत वर्गात बसून अभ्यासक्रमातही गुण मिळवायचे असतात. या दोन्हींचा समतोल राखण्याची मोठी कसोटी असते. एनडीएतला प्रत्येक दिवस असाच व्यस्त.,’ अशी आठवण पियुषने सांगितली.
‘भविष्यात लष्करात जायचे आहे. पायदळाच्या अधिकाऱ्यांचा मैदानावरील रुबाब, सैनिकांशी असलेले नाते आणि प्रत्यक्ष युद्धाच्या आघाडीवर मिळणारे आव्हान आकर्षित करते. आता देशासाठी मैदानावर उतरण्याची प्रतीक्षा आहे,’ असेही त्याने सांगितले.
समुद्राचे आकर्षण
बी.टेक शाखेत प्रथम क्रमांक मिळवून ‘सीआयएससी ट्रॉफी’ पटकावणारा छात्र मन्नेला नितीन हा आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणमचा. तो सांगतो, ‘घरची लष्करी पार्श्वभूमी नाही. वडील खाजगी कंपनीत सुपरवायझर, तर आई घरकाम करते. विशाखापट्टणमच्या समुद्रकिनाऱ्यावर नौदलाला जवळून पाहिल्यामुळे लहानपणापासूनच नौदलाचे आकर्षण. समुद्राच्या जवळच घर. किनाऱ्यावरच्या नौदलाच्या युद्धनौका, पाणबुड्या आणि पांढऱ्या शुभ्र गणवेशातील अधिकाऱ्यांकडे पाहून भारी वाटायचे. त्यांचेसारखेच अथांग समुद्रावर जाऊन देशाचे रक्षण करायचे ठरवले होते.’
लहानपणापासूनच हुशार असलेल्या मन्नेला नितीनसमोर अनेक पर्याय होते. बारावीत ९७ टक्के गुण मिळवणाऱ्या नितीनने एनडीएच्या प्रवेश परीक्षेतही २० वी रँक मिळवली होती, तर जेईईमध्येही यश संपादन केलेले. ‘एकाबाजूला कुटुंबासह नातेवाईकांचा आयआयटीच्या प्रवेशासाठीचा आग्रह आणि दुसरीकडे एनडीएचे स्वप्न, अशी द्विधा अवस्था. पण, ही निवड सोपी होती. सगळ्या प्रलोभनांना नकार देत एनडीएत आणि त्यानंतर नौदलात जायचे पक्के केलेले. आई-वडीलांना खाजगी नोकरी करून माझ्यासाठी घेतलेल्या सर्व कष्टांचे एनडीएतल्या यशाने सार्थक झाले. आता नौदलात जाऊन समुद्राची आव्हाने झेलण्याची ओढ आहे,’ असे नितीनने सांगितले.
