पुणे : ‘गणवेश हा केवळ अधिकार किंवा ताकद नाही, तर राष्ट्राच्या विश्वासाची सर्वोच्च जबाबदारी आहे. सामान्य नागरिक संकटकाळात गणवेशधाऱ्यांकडे आशेने पाहतात. त्यांना गणवेशात एक व्यक्ती नाही, तर संपूर्ण शासन व्यवस्था दिसते. गणवेशातील व्यक्तींवर कोणत्याही शंकेविना विश्वास ठेवला जातो. हा विश्वास केवळ सेवा, प्रामाणिकपणा आणि धैर्यानेच कमावता येतो आणि कधीही गमावता कामा नये,’ असे मत माजी पोलीस अधिकारी, माजी उपराज्यपाल डॉ. किरण बेदी यांनी शुक्रवारी व्यक्त केले.
‘भारत २०४७ मध्ये स्वातंत्र्याची शताब्दी साजरी करेल, तेव्हा राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीतून (एनडीए) बाहेर पडणारे तुम्ही सर्व जण देशाच्या महत्त्वाच्या आणि धोरणात्मक पदांवर कार्यरत असाल. त्यामुळे ‘देश प्रथम’ हाच विचार मनात ठेवून वाटचाल करा,’ अशी सादही त्यांनी घातली.
राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (एनडीए) १५० व्या तुकडीचा दीक्षांत समारंभात डॉ. बेदी बोलत होत्या. ‘एनडीए’चे प्रमुख व्हाइस ॲडमिरल अनिल जग्गी, उपप्रमुख एअर व्हाइस मार्शल राजेश वर्मा, प्राचार्य डॉ. विनय दीप या वेळी उपस्थित होते. या कार्यक्रमात बी.एससी शाखेत प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या पियुष रौतेला याला ‘चीफ ऑफ आर्मी स्टाफ ट्रॉफी’, बी.एससी कॉम्प्युटर सायन्समधील रणविजय त्यागी याला ‘चीफ ऑफ नेव्हल स्टाफ ट्रॉफी’, कला शाखेतील सुशांत वर्मा याला ‘चीफ ऑफ एअर स्टाफ ट्रॉफी’ आणि बी.टेक शाखेतील मन्नेला नितीन याला ‘सीआयएससी ट्रॉफी’ देऊन गौरविण्यात आले.
‘राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीतून (एनडीए) बाहेर पडणारा प्रत्येक छात्र हा केवळ पदवीधर नसतो. तो राष्ट्राच्या विश्वासाचा रक्षक असतो. २०४७ मध्ये भारत स्वातंत्र्याची १०० वर्षे पूर्ण करेल, त्या वेळी देशाच्या नेतृत्वाच्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या या अधिकाऱ्यांच्या खांद्यावर असतील.’ असेही डॉ. बेदी यांनी नमूद केले.
‘आजचे जग वेगाने बदलणारे आणि अनिश्चित आहे. युद्धे आता केवळ भौगोलिक सीमांवरच लढली जात नाहीत. ती सायबर क्षेत्र, माहिती युद्ध आणि धोरणात्मक निर्णय कक्षांमध्येही लढली जात आहेत. त्यामुळे अधिकाऱ्यांनी देश प्रथम याच भावनेने काम केले पाहिजे,’ असेही डॉ. बेदी म्हणाल्या.
‘नुकतीच ‘ऑपरेशन सिंदूर’ आणि जागभरात सुरू असलेल्या संघर्षांमध्ये तंत्रज्ञानाचा वापर वाढलेला दिसतो. अशा काळात लष्करी अधिकाऱ्यांनी विद्वान योद्धा म्हणून स्वतःला विकसित करणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि सायबर सुरक्षेच्या नव्या क्षेत्रांचा अभ्यास सुरू ठेवावा,’ असा सल्ला जग्गी यांनी दिला.
पदवी प्राप्त विद्यार्थ्यांची संख्या
शाखा …विद्यार्थ्यांची संख्या
– बी.ए. …५९
– बी.एस्सी. …६५
– बी.एस्सी. कॉम्प्युटर सायन्स …११२
– बी.टेक. आणि बी.टेक. ऑनर्स …११४
– एकूण छात्र …३५०
– महिला छात्र …१८
– परदेशी छात्र …२१
