पुणे: राष्ट्रीय संरक्षण प्रबोधनीच्या (एनडीए) १५० व्या तुकडीतील एकाने उरी सिनेमातून प्रेरणा घेत लष्करात जाण्याचे स्वप्न बघितले, तर एकाने वडिलांचा वारसा पुढे नेण्यासाठी कष्ट घेतले. ही कहाणी आहे, एनडीएत उत्तुंग यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांची.
‘उरी’ची प्रेरणा
बी.एससी कॉम्प्युटर सायन्स शाखेत प्रथम क्रमांक मिळवून ‘चीफ ऑफ नेव्हल स्टाफ ट्रॉफी’ पटकावणारा छात्र रणविजय त्यागी हा उत्तर प्रदेशातील मेरठचा. ‘वडील प्राध्यापक, तर आई शिक्षिका. लष्कराची कोणतीही कौटुंबिक पार्श्वभूमी नव्हती. पण, दहावीत असताना ‘उरी’ सिनेमा बघितला. त्यानंतर आपणही स्पेशल फोर्सेसमध्ये जाऊन देशासाठी योगदान द्यायला हवे, असे ठरवले. त्यासाठी वेगवेगळ्या पर्यायांची चाचपणी केली. शेवटी, एनडीएबद्दल कळाले आणि अभ्यासाला सुरूवात केली. शाळेतली शिस्त आणि अभ्यासाच्या जोरावर पात्रता परिक्षा उत्तीर्ण झालो,’ अशा शब्दांत रणविजयने एनडीएपर्यंतचा प्रवास सांगितला.
सामान्य जीवनातून थेट एनडीएच्या शिस्तीत सामावून घेणे सोपे रणविजयसाठी सोपे नव्हते. एनडीएतील प्रवासाबद्दल तो सांगतो,‘एनडीएमध्ये आल्यावर सुरुवातीला प्रत्येक गोष्टीत बंधन आहे, असे वाटले. पण, या बंधनांनाच इथे शिस्त म्हणले जायचे. ही शिस्त अंगिकारणे मानसिकदृष्ट्या अवघड होते. हळूहळू या शिस्तीचे महत्त्व समजले आणि त्यानंतर हा एनडीएतील प्रवासही सोपा होत गेला.’ ‘तिसऱ्या सत्रात कॉम्प्युटर सायन्सच्या पेपरमध्ये अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाले. त्यामुळे पहिला क्रमांक हुकला होता. नेमके काय झाले, हे माहित करून घेण्यासाठी फेरतपासणीसाठी अर्ज केला. एनडीएत गुण मिळाले की, त्यात बदल करणे कठीण असते. फेरतपासणीत गुण कमी होतील, असे एका शिक्षकाने बजावले. पण, मी फेरतपासणीसाठी अर्ज केला आणि चूकून गुणांच्या मोजणीत चूक झाल्याचे सापडले. शेवटी, गुण वाढले आणि मला पहिला क्रमांकही मिळाला,’ अशी आठवणही रणविजयने सांगितली.
वडिलांचा वारसा
कला शाखेत प्रथम क्रमांक मिळवून ‘चीफ ऑफ एअर स्टाफ ट्रॉफी’ पटकावणारा छात्र सुशांत वर्मा हा जम्मू-काश्मीरचा. ‘वडील ‘१३ जॅक रायफल्स’ पलटणीतून ऑनररी कॅप्टन म्हणून निवृत्त झालेले. त्यामुळे लहानपणापासूनच गणवेशाचे आकर्षण,’ लष्करात जाऊन वडिलांचा वारसा पुढे नेण्याची ईच्छा सुशांतने व्यक्त केली. त्याला वडिलांच्याच ‘१३ जॅक रायफल्स’ या पायदळ पलटणीचे नेतृत्व करायचे आहे.
प्राथमिक शिक्षण सामान्य शाळेतच झालेले. त्यामुळे लष्करी पार्श्वभूमी असूनही सुशांतसाठी एनडीएतील शिस्त नवखीच. एनडीएतल्या प्रवासाबद्दल तो सांगतो,‘एनडीएची सर्वात मोठी ताकद म्हणजे ‘ब्रदरहुड’. इथे कोणताही छात्र एकटा नसतो. शारीरिक किंवा मानसिकदृष्ट्या थकता, तेव्हा सिनिअर्स आणि मित्र मागे सोडून जात नाहीत. ते धीर देतात. त्यांच्याबरोबर पुढे घेऊन जातात. या सगळ्या सहकारी, मित्रांच्या मदतीमुळेच मी एनडीएच्या वातावरणात टिकू शकलो. एनडीएत सुरुवातीला जुळवून घेणे अवघड गेले. पण, आता १५० व्या ऐतिहासिक तुकडीचा भाग म्हणून बाहेर पडताना सार्थ अभिमान वाटतो.’
