पुणे : केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत (यूपीएससी) खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) आणि केरळमधील एझिमला येथील नौदल अकादमीच्या (नेव्हल अॅकॅडमी) प्रवेश प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आहे. या प्रवेश प्रक्रियेसाठी १० जानेवारीपर्यंत अर्ज करता येणार आहे.
एनडीए आणि नौदल अकादमी या देशातील दोन महत्त्वाच्या शैक्षणिक संस्थांची प्रवेश प्रक्रिया ही केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत राबवली जाते. त्याबाबतचे वेळापत्रक आयोगाने नुकतेच प्रसिद्ध केले आहे. फेब्रुवारी २०२४ मध्ये होणाऱ्या सत्रासाठी ही प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली असून १० जानेवारीपर्यंत अर्ज करता येणार आहे. १६ एप्रिल २०२३ रोजी लेखी परीक्षा घेतली जाणार असल्याचे आयोगाकडून कळवण्यात आले आहे.
वर्षांतून दोन वेळा केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून ही प्रवेश प्रक्रिया राबवली जाते. आता होणारी प्रवेश प्रक्रिया ही एनडीएच्या १५१ व्या तर नौदल अकादमीच्या ११३ व्या तुकडीसाठी असून, लेखी प्रवेश परीक्षा, मुलाखत आणि वैद्यकीय चाचणी अशा तीन टप्प्यांत ही प्रवेश प्रक्रिया पूर्ण केली जाते.
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन इच्छुक उमेदवार या प्रवेश प्रक्रियेसाठी अर्ज करू शकणार आहेत. प्रवेश अर्ज भरण्यासाठी ‘अॅक्टिव एक्झाम’ या पर्यायावर जाऊन प्रवेश अर्ज भरणे शक्य होणार आहे. एनडीएच्या ३७० आणि नौदल अकादमीच्या २५ जागांसाठी ही प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येत असून उमेदवारांच्या पात्रतेबाबत आवश्यक माहिती आयोगाच्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.