पुणे : राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (एनडीए) ऐतिहासिक १५०व्या अभ्यासक्रमाच्या दीक्षांत समारंभानिमित्त ‘सारंग’ हेलिकॉप्टर डिस्प्ले टीमकडून ‘एनडीए’च्या आकाशात थरारक हवाई कसरती सादर केल्या जाणार आहेत. महिला कॅडेट्सच्या तिसऱ्या पदवीधर तुकडीचाही या संचलनात समावेश असल्याने येत्या शुक्रवारी (२९ मे) होणारा यंदाचा समारंभ विशेष महत्त्वाचा ठरणार आहे.
दरम्यान, यंदा प्रथमच पाच हेलिकाॅप्टरच्या फाॅर्मेशनमधून ‘डायमंड’, ‘काॅसओव्हर’ तसेच प्रसिद्ध ‘सारंग स्प्लिट’ यांसारख्या कसरती सादर केल्या जाणार आहेत. ‘एनडीए’मधील ‘सुदान ब्लाॅक’ आणि ‘सलारिया स्क्वेअर’ परिसरात या हवाई कसरती होतील. या दीक्षांत समारंभाच्या पार्श्वभूमीवर ‘सारंग’ हेलिकाॅप्टर टीमने बुधवारी पत्रकारांशी संवाद साधला. स्क्वाड्रन लीडर निशांक अवस्थी, अजित सिंग, निदर्शना शर्मा या वेळी उपस्थित होत्या.
‘ॲडव्हान्स्ड् लाईट हेलिकॉप्टरच्या मूल्यमापन उड्डाणातून या टीमची सुरुवात झाली. २००४ मध्ये तिला ‘सारंग’ हे नाव देण्यात आले. संस्कृतमधील ‘सारंग’ म्हणजे मोर. आमच्या कसरतींतील देखणेपणा आणि लयबद्धतेचे ते प्रतीक आहे. ‘दुबई एअर शो’मध्ये ‘सूर्यकिरण’ टीमबरोबर केलेले संयुक्त सादरीकरण हा आमच्यासाठी महत्त्वाचा टप्पा होता,’ असे अवस्थी यांनी सांगितले.
अजित सिंग म्हणाले, ‘पूर्वी आमचे फॉर्मेशन चार हेलिकॉप्टरचे होते. आता त्यात पाचवे हेलिकॉप्टर समाविष्ट करण्यात आले आहे. गेल्या काही महिन्यांपासून आम्ही या नव्या फॉर्मेशनवर काम करीत आहोत. ‘डायमंड’ आणि ‘क्रॉसओव्हर’सारख्या कसरती आता पाच हेलिकॉप्टरसह सादर केल्या जातील. ‘सारंग हार्ट’मध्ये दोन हेलिकॉप्टर आकाशात हृदयाची आकृती तयार करतात आणि तिसरे हेलिकॉप्टर त्यातून बाणासारखे झेपावते. ‘सारंग स्प्लिट’ या अंतिम कसरतीतही आता पाच हेलिकॉप्टर सहभागी होतील.’
भारतीय हवाई दलाचे ‘ब्रँड ॲम्बेसेडर’ मानल्या जाणाऱ्या ‘सारंग’ टीमने देश-विदेशातील सादरीकरणांतून विशेष लौकिक मिळवला आहे. सन २००४ मध्ये सिंगापूर येथे झालेल्या ‘एशियन एरोस्पेस शो’मध्ये टीमने आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते. त्यानंतर जगभरातील ३९० हून अधिक ठिकाणी १,२०० पेक्षा अधिक हवाई सादरीकरणे करून या टीमने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले आहे.
‘सारंग’ टीमकडून ‘हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड’ने विकसित केलेल्या स्वदेशी ॲडव्हान्स्ड् लाईट हेलिकॉप्टर ‘ध्रुव’चा वापर केला जातो. सर्व हवामानात कार्यक्षम आणि बहुउद्देशीय क्षमता असलेले हे हेलिकॉप्टर ‘आत्मनिर्भर भारत’ संकल्पनेचे प्रतीक मानले जाते. २९ मे रोजी दुपारी साडेबारा वाजल्यापासून ‘एनडीए’तील ‘सुदान ब्लॉक’ आणि ‘सलारिया स्क्वेअर’ परिसरात या हवाई कसरती होणार आहेत.
