पुणे : राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीतील (एनडीए) प्रथम सत्रातील छात्र अभिनव बाजपेयी (वय १७, मूळ रा. कानपूर, उत्तर प्रदेश) याचा शुक्रवारी (१० जुलै) सकाळी नियमित शारीरिक प्रशिक्षणादरम्यान अचानक प्रकृती बिघडल्याने मृत्यू झाला. या प्रकरणी एनडीए प्रशासनाने चौकशीचे आदेश दिले आहेत.
अभिनव बाजपेयी याने २४ जून २०२६ रोजी एनडीएमध्ये प्रवेश घेतला होता. शुक्रवारी सकाळी प्रवेशानंतरच्या पहिल्या अधिकृत शारीरिक प्रशिक्षण (पीटी) परेडदरम्यान त्याने अस्वस्थ वाटत असल्याचे सांगितले. त्यानंतर तो अचानक बेशुद्ध पडला. त्यांना तातडीने खडकवासला येथील लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
तेथे वैद्यकीय पथकाने त्याच्यावर तातडीचे उपचार करण्याचे वैद्यकीय पथकाने सर्वतोपरी प्रयत्न करूनही अभिनवला वाचवण्यात यश आले नाही आणि त्याला मृत घोषित करण्यात आले. या घटनेमागील नेमकी कारणे व परिस्थितीचा तपास करण्यासाठी एनडीए प्रशासनाने चौकशीचे आदेश दिले आहेत. मृत पावलेल्या छात्राच्या कुटुंबीयांना, तसेच पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली आहे, अशी माहिती संरक्षण विभागाने दिली.
छात्र अभिनव बाजपेयी याच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त करत एनडीए प्रशासनाने त्याच्या कुटुंबीयांप्रती शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत, असेही नमूद करण्यात आले.
गेल्यावर्षी दोन छात्रांचा मृत्यू
गेल्यावर्षी, ऑक्टोबर २०२५मध्ये एनडीएतील छात्रांचा मृत्यू झाल्याच्या दोन घटना घडल्या होत्या. त्यात अंतरिक्षकुमार सिंग या छात्राने स्वतःच्या खोलीत गळफास लावून घेतला, होता, तर आदित्य यादव या छात्राचा पोहण्याच्या सरावादरम्यान मृत्यू झाला होता.
