पुणे : राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये (एनडीए) राष्ट्रीय शैक्षणिक शिक्षण धोरण २०२० नुसार आता नवा अभ्यासक्रम विकसित करण्यात आला आहे. तंत्रज्ञानाचा वाढता प्रभाव, बदलत्या युद्धनीतीचा विचार करून नव्या अभ्यासक्रमात कृत्रिम बुद्धिमत्ता, मशिन लर्निंग, ड्रोन तंत्रज्ञान अशा उदयोन्मुख क्षेत्रांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच, श्रेयांक रचना लागू करण्याचेही नियोजन आहे.

प्रतिष्ठेच्या ‘सभीकी चषक’ या क्रीडा स्पर्धेचे आयोजन ‘एनडीए’मध्ये १८ ते २१ मार्च या कालावधीत करण्यात आले आहे. या स्पर्धेत ‘एनडीए’सह डेहराडून येथील ‘इंडियन मिलिटरी ॲकॅडमी’, डुंडीगल येथील ‘एअर फोर्स ॲकॅडमी’, एळिमला येथील ‘इंडियन नेव्हल ॲकॅडमी’, चेन्नई आणि गया येथील ‘ऑफिसर्स ट्रेनिंग ॲकॅडमी’ या संस्थांतील ४२९ छात्रांचा स्पर्धेत सहभाग आहे. त्यात ९८ महिला छात्रा पहिल्यांदाच या स्पर्धेत सहभागी झाल्या आहेत. स्पर्धेत क्रॉसकंट्री, फुटबॉल, बास्केटबॉल, हॉकी, व्हॉलिबॉल, टेनिस, स्क्वॉश अशा खेळांचा समावेश आहे. या स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर ‘एनडीए’चे प्रमुख व्हाइस ॲडमिरल अनिल जग्गी यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

जग्गी म्हणाले, ‘एनडीए’मध्ये राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या अंमलबजावणीची प्रक्रिया सुरू करण्यात येत आहे. त्यासाठी नवा अभ्यासक्रम विकसित करण्यात आला आहे. तंत्रज्ञानाचा वाढता प्रभाव, बदलती युद्धनीती विचारात घेऊन अभ्यासक्रमात कृत्रिम बुद्धिमत्ता, मशिन लर्निंग, ड्रोन तंत्रज्ञान अशा उदयोन्मुख क्षेत्रांचा समावेश करण्यात आला आहे. छात्रांना या विषयांची प्राथमिक स्वरूपात ओळख करून दिली जाणार आहे. तसेच, श्रेयांक रचना लागू करण्याचेही नियोजन आहे. त्यामुळे ‘एनडीए’मध्ये होणाऱ्या शारीरिक प्रशिक्षणासह उपक्रमांचे श्रेयांक छात्रांना मिळतील. काही कारणाने एखाद्या छात्राला ‘एनडीए’ सोडण्याची वेळ आल्यास त्याला श्रेयांक रचनेमुळे अन्य शिक्षण संस्थेत प्रवेश मिळणे सुलभ होईल.

महिला प्रशिक्षकांची गरज

‘एनडीए’तील महिला छात्रांची पहिली तुकडी प्रशिक्षण पूर्ण करून बाहेर पडली आहे. त्यानंतर संबंधित लष्करी संस्थांतून पुढील एक वर्षाचे प्रगत लष्करी प्रशिक्षण पूर्ण करून ही तुकडी पुढील काही महिन्यांत लष्करात रुजू होणार आहे. या अनुषंगाने जग्गी म्हणाले, ‘‘एनडीए’च्या प्रशिक्षणामध्ये शारीरिक प्रशिक्षण महत्त्वाचा भाग आहे. पुरुष छात्रांप्रमाणेच महिला छात्र शारीरिक प्रशिक्षणामध्ये उत्तम कामगिरी करतात. अखेरच्या सत्रातील ‘जोश रन’मध्येही महिला छात्रांचा उत्साही सहभाग असतो. आतापर्यंत महिला छात्रांना शारीरिक शिक्षणाच्या प्रशिक्षणासाठी पुरुष मार्गदर्शकच कार्यरत आहेत. मात्र, आता शारीरिक प्रशिक्षणासाठी मार्गदर्शकांची संख्या वाढवण्याची गरज आहे. त्यातही महिला छात्रांसाठी महिला मार्गदर्शक असणे आवश्यक आहे. त्याबाबतची मागणी सक्षम प्राधिकरणाकडे करण्यात आली आहे.’