पुणे : ‘आपला देश २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. हा काळ तरुण पदवीधरांसाठी संधींचा आहे. मात्र, या संधींचा योग्य उपयोग करण्यासाठी विद्यार्थ्यांनी स्वतःचे सामर्थ्य, मर्यादा आणि संभाव्य आव्हाने यांचे विश्लेषण करणे आवश्यक आहे,’ असे मत राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे (एनडीए) कमांडंट, व्हाइस ॲडमिरल अनिल जग्गी यांनी व्यक्त केले.
जयवंत शिक्षण प्रसारक मंडळाच्या (जेएसपीएम) विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात ते बोलत होते. संस्थेचे संस्थापक सचिव आमदार डॉ. तानाजी सावंत, विद्यापीठाचे अध्यक्ष डॉ. रवी जोशी, कुलगुरू डॉ. राजेंद्र कानफाडे, प्र-कुलगुरू डॉ. अजित थेटे, कुलसचिव डॉ. विशाल चौधरी, व्यवस्थापन समितीचे सदस्य डॉ. एस. बी. निमसे, डॉ. देवानंद शिंदे, व्यवस्थापन अधिष्ठाता डॉ. दत्तात्रय भिसे, ‘जेएसपीएम’चे संचालक अनिल भोसले, डॉ. पी. पी. विटकर आणि डॉ. वसंत बुगडे, विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. स्वप्निल लहुडकर, डॉ. प्रभा सिंग, डॉ. पायल धांडे आणि डॉ. जयश्री हजारिका या वेळी उपस्थित होते.
या वेळी विविध विद्याशाखांतील १,१७३ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. त्यात पदवी स्तरावरील ७७० आणि पदव्युत्तर स्तरावरील ४०३ आणि पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन ईआरपी अभ्यासक्रमातील २५ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. तसेच, १७ गुणवंत विद्यार्थ्यांना सुवर्णपदकाने गौरविण्यात आले. तर ३० विद्यार्थ्यांना विद्यापीठ गुणवत्ता यादीतील समावेशासाठी सन्मानित करण्यात आले.
‘विद्यार्थ्यांनी केवळ नोकरी मिळविण्यापुरते आपले ध्येय मर्यादित ठेवू नये. बदलत्या जगात संधींची कमतरता नाही. मात्र, त्या ओळखण्याची आणि त्यांचे रूपांतर यशात करण्याची क्षमता विकसित करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी स्वतःचे उद्योग सुरू करावेत, स्टार्ट अप उभारावेत आणि इतरांसाठी रोजगार निर्माण करावा,’ असे आवाहन सावंत यांनी केले.
