पुणे : राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीतील (एनडीए) महिला छात्रांच्या समावेशानंतर गेल्या वर्षी आणि यंदा शैक्षणिक कामगिरीसाठी प्रत्येकी एका महिला छात्राने पदक मिळवले. तसेच, राष्ट्रपती कांस्य पदक मिळवणारी सिद्धी जैन ही पहिली महिला छात्र ठरली. विशेष म्हणजे, कोणतीही लष्करी पार्श्वभूमी नसलेल्या सिद्धीने ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’तील (एनआयटी) अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रम सोडून दुसऱ्या प्रयत्नात ‘एनडीए’मध्ये प्रवेश मिळवला होता.
‘एनडीए’च्या १४९ व्या तुकडीचे दीक्षांत संचलन रविवारी खेत्रपाल मैदानावर झाले. ‘एनडीए’चे प्रमुख व्हाइस ॲडमिरल अनिल जग्गी या वेळी उपस्थित होते. यंदाच्या १४९ व्या तुकडीच्या संचलनातील ३२९ छात्रांमध्ये १५ महिला छात्र, मित्रदेशांतील १८ छात्रांचा समावेश होता. प्रशिक्षणादरम्यान उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या छात्रांना गौरवण्यात आले. त्यात दीपक कांडपाल याला सर्वोत्कृष्ट अष्टपैलू कामगिरीसाठी राष्ट्रपती सुवर्ण पदक, सिद्धार्थ सिंग याला राष्ट्रपती रौप्य पदक प्रदान करण्यात आले. तर ‘गोल्फ’ स्क्वाड्रनला ‘चीफ ऑफ स्टाफ बॅनर’ प्रदान करण्यात आला.
पदवी प्रदान कार्यक्रमात सर्वोत्कृष्ट शैक्षणिक कामगिरीसाठी संगणक विज्ञान शाखेचे रौप्य पदक अनन्या बालोनी हिने मिळवले होते. राष्ट्रपती कांस्य पदक मिळवलेली पहिली महिला छात्र ठरण्याचा मान मिळवलेली सिद्धी जैन मूळची उत्तर प्रदेशातील उझानी येथील आहे. तिचे आई-वडील शिक्षक आहेत. ‘एनडीए’तील प्रशिक्षणानंतर आता सिद्धी पुढील प्रशिक्षणासाठी डिंडीगुल येथील हवाई दलाच्या ॲकॅडमीत जाणार आहे.
पदक मिळवण्यासाठी उभे राहण्याचा अनुभव फार कमाल होता. या क्षणाची मी कधी कल्पनाही केली नव्हती. ‘एनडीए’तील पहिले सत्र माझ्यासाठी आव्हानात्मक होते. मात्र, मार्गदर्शकांनी केलेली मदत, प्रोत्साहनाच्या जोरावर यशस्वीरित्या प्रशिक्षण पूर्ण करू शकले, अशी भावना सिद्धीने व्यक्त केली.
‘विचारांच्या वेगाने बदलणारे तंत्रज्ञान भविष्यातील मोठी संपत्ती ठरणार आहे. या बदलत्या आणि आव्हानात्मक जगात समर्थपणे सामोरे जाण्यासाठी धैर्य, कौशल्य आणि चारित्र्य हे तीन गुण महत्त्वाचे आहेत,’ असा कानमंत्र नौदलप्रमुख ॲडमिरल दिनेश के. त्रिपाठी यांनी छात्रांना दिला. ‘महिला छात्रांच्या दुसऱ्या तुकडीचा दीक्षांत सोहळा सैन्यदलातील महिलांच्या वाढत्या सहभागाचे आणि सक्षमीकरणाचे प्रतीक आहे. सैन्यात सोप्या, सुखकर, पूर्वनियोजित जीवनाची हमी देऊ शकत नाही. नऊ ते पाचच्या नियमित कामकाजासारखे जीवन तर अजिबातच मिळणार नाही. मात्र, अर्थपूर्ण आयुष्याची हमी देऊ शकतो,’ असेही त्यांनी सांगितले.
पत्रकारांच्या बैठक व्यवस्थेत गैरसोय
दीक्षान्त संचलनाच्या वार्तांकनासाठी गेलेले पत्रकार, छायाचित्रकारांच्या बैठकीची व्यवस्था ऐन वेळी बदलण्यात आल्याने गैरसोय झाली. हे ‘एनडीए’तील अधिकाऱ्यांना निदर्शनास आणून देऊनही नियोजनात बदल करण्यास एनडीए प्रशासन राजी झाले नाही. उलट, ‘ठरवून दिलेल्या जागीच बसावे लागेल, आखून दिल्यानुसारच छायाचित्रण, वार्तांकन करावे लागेल,’ असे सांगत, ‘तुमच्यामुळे या पूर्वीचे संचलन ‘फ्लॉप’ झाले’ असे पत्रकारांनाच सुनावले. त्यामुळे पत्रकारांनी संचलनावर बहिष्कार घातला. पत्रकारांशी झालेल्या या गैरवर्तणुकीचा पुणे श्रमिक पत्रकार संघाने निषेध केला असून, या प्रकरणी चौकशी करून कारवाई करावी,’ अशी मागणी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, संरक्षण दलप्रमुख जनरल अनिल चौहान, लष्करप्रमुख, नौदलप्रमुख, हवाई दल प्रमुखांना करण्यात आली आहे.
