शेखर चरेगावकर यांची अपेक्षा

देशातील लोकसंख्येचा विचार करता युवक हेच भविष्यातील ग्राहक आहेत. त्यामुळे युवा ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सहकार क्षेत्राने योग्य बदल स्वीकारावेत, अशी अपेक्षा राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर यांनी व्यक्त केली.

विद्या सहकारी बँकेच्या ४२व्या वर्धापनदिनानिमित्त ग्राहकांसाठी सुरू करण्यात आलेल्या ‘विद्यावाणी’ आणि ‘डॉक्युमेंट मॅनेजमेंट सिस्टिम सॉफ्टवेअर अँड डिजिटायझेशन सव्‍‌र्हिसेस’ या दोन संगणक प्रणालींचे उद्घाटन चरेगावकर यांच्या हस्ते झाले. बँकेचे अध्यक्ष गणेश घुले, संस्थापक-संचालक प्रा. आर. जी. बापट आणि कार्यवाहक संचालक विद्याधर अनास्कर या वेळी उपस्थित होते.

चरेगावकर म्हणाले, सहकारी संस्थांमध्ये सध्या येणाऱ्या ग्राहक वर्गाचे प्रमाण हे पन्नाशीच्या पुढचे आहे, मात्र भारत हा जगातील सर्वात तरुण देश होण्याकडे झपाटय़ाने वाटचाल करीत आहे. देशातील ६५ टक्के लोकसंख्या ही ४० वर्षांखालील असेल. देशाचे अर्थकारण ज्यांच्या हातामध्ये जाणार आहे ती युवा पिढी सहकार क्षेत्राकडे वळेल का हा खरा प्रश्न आहे. त्यामुळे समाजाची गरज ओळखून युवकांना सहकारी चळवळीकडे आकर्षित करून घेण्यासाठी काम केले तरच सहकार टिकून राहील. एकीकडे परदेशी बँका आणि खासगी बँका यांचे आव्हान असताना आधुनिकतेचा स्वीकार करून बँकिंग सेवा सुधारली तर सहकारी बँकांना कोणतीही अडचण येणार नाही.

गणेश घुले यांनी प्रास्ताविक केले. विद्याधर अनास्कर यांनी आभार मानले. बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिनकर नाडगौडा यांनी सूत्रसंचालन केले.