पुणे : ‘व्याकरणाचे दडपण न घेता भाषेतील गमती समजून घेऊन भाषा शिकता आली पाहिजे. पुढील पिढीपर्यंत अभिजात मराठी भाषा पोहोचविण्याची जबाबदारी आपली आहे,’ असे मत ज्येष्ठ समीक्षक-लेखिका डॉ. नीलिमा गुंडी यांनी बुधवारी व्यक्त केले.

साहित्य प्रसार आणि वाचन संस्कृतीच्या संवर्धनासाठी कार्यरत असलेल्या अक्षरधारा बुक गॅलरीतर्फे खास उन्हाळ्याच्या सुटीनिमित्त ६ मे ते ३१ मे या कालावधीत बाल कुमार शब्दोत्सव आयोजित करण्यात आला आहे. त्याचे उद्घाटन डॉ. नीलिमा गुंडी यांच्या हस्ते झाले. त्या वेळी त्या बोलत होत्या.

महोत्सवाच्या उद्घाटनानंतर डॉ. नीलिमा गुंडी यांच्या विश्वास प्रकाशनाच्या ‘अर्थाचा पत्ता सापडला’ या पुस्तकाचे आणि बालसाहित्यकार एकनाथ आव्हाड यांच्या ‘गंमत गाणी’ व ‘मजेदार कोडी’ या पुस्तकांचे प्रकाशन झाले. यानंतर ‘गट्टी मराठीशी’ हा मुलांसाठी विशेष कार्यक्रमदेखील झाला.

‘आपण जन्माला आल्यापासून भाषा आपसूकच शिकत असतो. मुळात ऐकून आणि निरीक्षण करून लहान मुले भाषा अवगत करीत असतात,’ असे गुंडी यांनी नमूद केले.

आव्हाड म्हणाले, ‘मुलांचे भावविश्व समजून घेऊन पुस्तकरूपी बाग फुलवून आपण त्यांचे भावविश्व अधिक समृद्ध केले पाहिजे. पुस्तकांच्या माध्यमातून होणारे संस्कार चिरकाल टिकणारे असतात.’ विश्वास प्रकाशनाच्या वैशाली कार्लेकर यांनी प्रास्ताविक केले. रसिका राठिवडेकर यांनी सूत्रसंचालन केले.