पिंपरी : आर्थिक संकट व आखाती युद्धाच्या पार्श्वभूमीवर सर्व विभागांनी पुढील सहा महिने सल्लागार नेमू नयेत, असा आदेश आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिला असताना ‘क’ क्षेत्रीय कार्यालयाच्या स्थापत्य विभागाने छत्रपती संभाजी महाराज पुतळ्याच्या परिसरात स्थापत्यसह इतर कामांसाठी सल्लागार नियुक्तीचा प्रस्ताव आणला. त्याला शिवसेना (शिंदे) पक्षाचा विरोध डावलून स्थायी समितीनेही मान्यता दिली.
महापालिकेच्या वतीने बोऱ्हाडेवाडी, मोशी येथे छत्रपती संभाजी महाराज यांचा शंभर फूट उंचीचा पुतळा उभारण्याचे काम सुरू आहे. टप्पा क्रमांक एकमध्ये पुतळ्याचे आवश्यक चौथऱ्याचे काम करण्यासाठी १२ कोटी ४७ लाख रुपयांची निविदा मंजूर केली होती. टप्पा दोनमध्ये पुतळा उभारण्यासाठी ३२ कोटी ८४ लाख रुपयांची निविदाही मंजूर करण्यात आली. टप्पा तीनमध्ये पुतळ्याच्या चौथऱ्याचे उर्वरित काम करणे व परिसर सुशोभीकरणासाठी १५ कोटी ११ लाख रुपयांची निविदा मंजूर केली आहे. आता टप्पा क्रमांक चारनुसार ताब्यात आलेल्या उर्वरित जागेत स्थापत्य व विद्युतविषयक कामांसाठी ३२ कोटी ३४ लाख रुपयांची निविदा मंजूर केली आहे.
आतापर्यंत पुतळ्याच्या एकाच कामासाठी एकूण ९२ कोटी ७६ लाख रुपये खर्चाच्या वेगवेगळ्या चार निविदा काढण्यात आल्या आहेत. पुतळ्यासाठी ताब्यात आलेल्या उर्वरित जागेत स्थापत्य व विद्युतविषयक कामे करण्यात येणार आहेत. त्यासाठी एका संस्थेचा सल्लागार नियुक्तीचा प्रस्ताव स्थायी समिती सभेसमोर होता. त्यावर टप्पा चारच्या निविदा प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात अनागोंदी झाली होती. जुन्याच सल्लागाराला काम दिले जात असल्याकडे शिवसेनेने लक्ष वेधले. मात्र, सत्ताधारी भाजपने हा विषय मंजूर केला.
उपमुख्यमंत्र्यांकडे तक्रार
छत्रपती संभाजी महाराज पुतळ्याच्या कामाच्या टप्पा चारच्या निविदा प्रक्रियेवर दोन्ही सभागृहांत चर्चा झाली. आक्षेप नोंदविले. मात्र, त्यावर उत्तर आलेले नाही. अद्याप चौकशी केलेली नाही. निविदापूर्व कामांसाठी नियुक्त केलेल्या सल्लागाराने चुकीच्या पद्धतीने प्रकल्पाचे अंदाजपत्रक व निविदा अटी-शर्ती तयार केल्या आहेत. सगळ्या कामासाठी एकच सल्लागार आहे. अंदाजपत्रक तयार करताना केलेला बेकायदा कारभार लपविण्यासाठीच या सल्लागाराची नियुक्ती केली आहे. त्यामुळे पुढील कामांसाठी त्याच सल्लागाराची नेमणूक करणे चुकीचे आहे, असा आरोप सुलभा उबाळे यांनी केला आहे. या संदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार केल्याचेही त्यांनी सांगितले.
