पुणे : देशभरात गाजत असलेल्या ‘नीट’ प्रश्नपत्रिका फुटल्याच्या प्रकरणात पुण्यातील ब्यूटीपार्लर चालविणारी महिला मनीषा वाघमारे आणि अहिल्यानगर येथील धनंजय लोखंडे यांना केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) गुरुवारी रात्री उशिरा अटक केली. तर, अभियांत्रिकी शाखेतील एका विद्यार्थ्याला चौकशीनंतर सोडून देण्यात आले आहे.

‘नीट’ पेपरफुटी प्रकरणात सीबीआयने अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी येथून धनंजय लोखंडे (वय २६) याला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्या संपर्कातील पुण्यातील लागेबांधे समोर आले होते. त्यानुसार, बिबवेवाडी परिसरात ब्यूटीपार्लर चालविणारी मनीषा वाघमारे आणि अभियांत्रिकी शाखेत शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थ्याला पुणे पोलिसांनी बुधवारी (१३ मे) ताब्यात घेतले होते. त्यानंतर दोघांनाही पुढील चौकशीसाठी सीबीआयच्या ताब्यात देण्यात आले. गुरुवारी सीबीआयने तपासानंतर धनंजय लोखंडे आणि मनीषा वाघमारे हिला अटक केली. या प्रकरणात यापूर्वी पाच आरोपींना अटक करण्यात आली होती. त्यामध्ये जयपूरमधील तीन, गुरुग्राममधील एक आणि नाशिकमधील एका आरोपीचा समावेश आहे.

दरम्यान, वाघमारे हिच्या बँक खात्यात नीट परीक्षेच्या कालावधीत काही संशयास्पद आर्थिक व्यवहार झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले होते. तसेच, मोबाईलमधील काही संदेश हटविण्यात आल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहे. सीबीआयने प्राथमिक तपास केल्यानंतर गुरुवारी रात्री वाघमारे हिला अटक केली. या प्रकरणात आणखी काही जणांची चौकशी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून, सीबीआयकडून विविध ठिकाणांवरील डिजिटल पुरावे आणि आर्थिक व्यवहारांची माहिती तपासली जात आहे.