पुणे : देशभर गाजत असलेल्या ‘नीट’ पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) पुण्यातील खासगी ‘नीट’ मार्गदर्शन वर्गातील शिक्षक हर्षद शहा, तसेच लातूरमधील डाॅ. मनोज शिरुरे यांना अटक केली. नीट’ पेपरफुटी प्रकरणातील मुख्य सूत्रधार प्रा. पी. व्ही. कुलकर्णी याला अटक करण्यात आली होती. लातूरमधील डाॅ. मनोज शिरुरे यांनी कुलकर्णी यांच्याकडून रसायनशास्त्राचे प्रश्न मिळविले होते. डाॅ. शिरुरे यांची या प्रकरणात ‘सीबीआय’कडून चौकशी करण्यात आली होती. त्याानंतर डाॅ. शिरुरे यांना ‘सीबीआय’ने अटक केली.
‘‘नीट’ पेपरफुटी प्रकरणात आतापर्यंत १३ जणांना अटक करण्यात आली. डाॅ. शिरुरे हे मूळचे लातूरचे आहेत. ‘नीट २०२६’ पेपरफुटी प्रकरण उघडकीस आल्यानंतर ‘सीबीआय’ने तपास सुरू केला. यापूर्वी या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या प्रा. कुलकर्णी यांच्याकडून डाॅ. शिरुरे यांनी रसायनशास्त्राचे प्रश्न मिळवले होते. हे प्रश्न आणि अचूक उत्तरे डाॅ. शिरुरे यांनी लातूरमधील एका शिकवणी वर्ग चालकाच्या मुलासह तीन विद्यार्थ्यांना दिले होते. तपासात ही बाब उघडकीस आल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली’, अशी माहिती ‘सीबीआय’ने दिली.
‘पुण्यातील शिवाजीनगर भागात असलेल्या एका खासगी शिकवणी वर्गातील भौतिकशास्त्राचे शिक्षक तेजस हर्षदकुमार शहा यांंना अटक करण्यात आली. पेपरफुटी प्रकरणात अटक करण्यात आलेल्या शिक्षिका मनीषा हवालदार यांनी शहा यांना भौतिकशास्त्राचे प्रश्न आणि अचूक उत्तरे दिली होती. हवालदार यांची चैाकशी करण्यात आली. त्यानंतर शहा यांना अटक करण्यात आली’, अशी माहिती ‘सीबीआय’मधील अधिकाऱ्यांनी दिली.
पेपरफुटीनंतर ४९ ठिकाणी छापे
‘नीट’ पेपरफुटी प्रकरणात ‘सीबीआय’कडे १२ मे रोजी तक्रार दाखल करण्यात आली होती. याबाबत केंद्र शासनाच्या उच्च शिक्षण विभागाने तक्रार दिली होती. त्यानंतर ‘सीबीआय’च्या पथकाने दिल्ली, जयपूर, गुरुग्राम, नाशिक, पुणे, लातूर, अहिल्यानगर भागात छापे टाकले. आतापर्यंत ४९ ठिकाणी छापे टाकण्यात आले होते. तपासात रसायनशास्त्र, जीवशास्त्र, भौतिकशास्त्र या विषयांचे प्रश्न परीक्षेपूर्वीच फुटल्याचे उघडकीस आले होते. पेपरफुटी प्रकरणातील साखळी उघड करण्यासाठी सीबीआयकडून तपास सुरू आहे. या कारवाईत आरोपींकडून मोबाइल संच, लॅपटाॅप, कागदपत्रे जप्त केली हाेती. या प्रकरणाचा सखोल तपास करण्यात येत आहे. जप्त करण्यात आलेला लॅपटाॅप, मोबाइलचे तांत्रिक विश्लेषण करण्याचे काम सुरू आहे.
‘नीट’ पेपरफुटीचे पुणे केंद्र ?
या प्रकरणात मुख्य सूत्रधार रसायनशास्त्राचा प्राध्यापक पी. व्ही. कुलकर्णी याला ‘सीबीआय’ने पुण्यातून ताब्यात घेतले होते. पुण्यातील बिबवेवाडी भागात राहणारी ब्युटीपार्लरचालक महिला मनीषा वाघमारे हिला अटक करण्यात आली होती. वाघमारेची चौकशी करण्यात आली. तेव्हा वाघमारेच्या घरात माॅडर्न महाविद्यालयातील जीवशास्त्राची शिक्षिका मनीषा गुरुनाथ मांढरे हिने विद्यार्थ्यांसाठी विशेष मार्गदर्शन वर्ग घेतला होता. त्यानंतर मांढरेला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. दिल्लीतील ‘सीबीआय’कार्यालयात चैाकशी करण्यात आल्यानंतर तिला अटक करण्यात आली. मांढरे, प्रा. कुलकर्णी हे परीक्षा प्रक्रियेशी (एनटीए) संबंधित होते. तपासादरम्यान त्यांना विद्यार्थ्यांना प्रश्न आणि अचूक उत्तरांची माहिती दिली होती. तपासात मिळालेल्या माहितीनुसार भौतिकशास्त्राच्या शिक्षिका मनीषा संजय हवालदार यांना अटक करण्यात आली. हवालदार या परीक्षा प्रक्रियेशी संबंधित आहेत. त्यानंतर पुण्यातून खासगी शिकवणी वर्गातील भाैतिकशास्त्राचे शिक्षक हर्षद शहा यांना अटक करण्यात आली. पेपरफुटी प्रकरणात आतापर्यंत चौघांना अटक केली आहे. आरोपींनी केलेल्या आर्थिक व्यवहाराची चौकशी करण्यात येत आहे.या प्रकरणात रसायनशास्त्र विषयाशी संबंधित एका शिक्षिकेची चाैकशी करण्यात येत आहे. पेपरफुटी प्रकरणात आणखी काहींना अटक होण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
