पुणे : ‘नीट’ पेपरफुटी प्रकरणात अटकेत असलेले लातूरमधील आरसीसी क्लास या शिकवणी वर्गाचे संचालक प्रा. शिवराज मोटेगावकर यांच्या मुलाची मंगळवारी चौकशी करण्यात आली. पुण्यातील केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) कार्यालयात मोटेगावकर यांच्या मुलाची पाच ते सहा तास चौकशी करण्यात आली.
मोटेगावकर यांचा मुलगा नुकताच बारावी उत्तीर्ण झाला असून, पेपरफुटी प्रकरणाचा त्याला फायदा झाला का ? यादृष्टीने तपास करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. पेपरफुटी प्रकरणात प्रा. मोटेगावकर यांची रविवारी (१७ मे) पुण्यातील ‘सीबीआय’ कार्यालयात बारात तास चाैकशी करण्यात आली. पेपरफुटी प्रकरणात अटक करण्यात आलेले प्रा. पी.व्ही. कुलकर्णी यांचे प्रा. मोटेगावकर यांच्याशी संबंध असल्याचे चौकशीत उघड झाले. त्यानंतर प्रा. मोटेगावकर यांना सोमवारी ‘सीबीआयने अटक केली. विशेष न्यायालयाने मोटेगावकर यांना नऊ दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
पेपरफुटी प्रकरणाचा फायदा काही विद्यार्थ्यांना झाला असल्याचा संशय ‘सीबीआय’च्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. प्रा. मोटेगावकर यांच्या मुलाला पेपरफुटी प्रकरणाचा फायदा झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून, त्याअनुषंगाने ‘सीबीआय’च्या अधिकाऱ्यांनी त्याची पुण्यातील कार्यालयात मंगळवारी चौकशी करण्यात आली.
पेपरफुटी प्रकरणात विद्यार्थ्यांची चौकशी
पेपरफुटी प्रकरणात प्रा. मोटेगावकर यांच्या ‘आरसीसी क्लास’मध्ये शिकणाऱ्या तीन विद्यार्थ्यांची चौकशी करण्यात येणार आहे. संबंधित विद्यार्थ्यांना पालकांसोबत ‘सीबीआय’ कार्यालयात उपस्थित राहण्याबाबत सूचना करण्यात आली आहेत. परीक्षेपूर्वी त्यांना प्रश्नपत्रिका मिळाली होती का ? तसेच प्रा. मोटेगावकर यांच्या मुलाची त्याअनुषंगाने स्वतंत्रपणे चौकशी करण्यात येणार आहे. या प्रकरणात आणखी काही जणांना तपासाच्या अनुषंगाने उपस्थित राहण्याबाबत सूचना करण्यात आली आहे.
मोटेगावकर यांचे परीक्षाप्रक्रियेतील प्राध्यापकांशी संबंध ?
प्रा. मोटेगावकर यांचे परीक्षाप्रक्रियेतील (एनटीए) प्राध्यापकांशी संबंध असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. त्याअनुषंगाने सीबीआयकडून प्रा. मोटेगावकर यांचा मोबाइल संच, लॅपटाॅपची तांत्रिक तपासणी करण्यात येणार आहे. त्यांच्या बँक व्यवहारांची तपासणी करण्यात येणार आहे.
