पुणे : देशभरात गाजत असलेल्या नीट पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) पुण्यातून आणखी एका शिक्षिकेला अटक केली. अटक करण्यात आलेल्या शिक्षिका मनीषा संजय हवालदार या परीक्षा प्रक्रियेशी (एनटीए) संबंधित असून, त्यांनी भौतिकशास्त्राचे प्रश्न फोडल्याचे उघडकीस आले आहे.
मनीषा हवालदार या बुधवार पेठेतील शेठ हिरालाल सराफ प्रशालेत भौतिकशास्त्राच्या शिक्षिका आहेत. हवालदार या ‘नीट २०२६’ या परीक्षा प्रक्रियेत सहभागी होत्या. राष्ट्रीय परीक्षा संस्थेत (एनटीए) त्यांची तज्ज्ञ म्हणून नियुक्ती केली होती. भौतिकशास्त्रच्या विषयाच्या प्रश्नपत्रिकेची त्यांना माहिती होती. पेपरफुटी प्रकरणात अटक करण्यात आलेल्या माॅडर्न महाविद्यालयातील शिक्षिका मनीषा मांढरे यांना एप्रिल महिन्यात ‘नीट’ परीक्षेतील भौतिकशास्त्राचे काही प्रश्न दिले होते.
त्यांनी दिलेले प्रश्न प्रत्यक्ष परीक्षेतील प्रश्नपत्रिकेत आले होते. याबाबतची माहिती तपासात मिळाल्यानंतर हवालदार यांना अटक करण्यात आली, अशी माहिती ‘सीबीआय’ने दिली. या प्रकरणात मुख्य सूत्रधार रसायनशास्त्राचा प्राध्यापक पी. व्ही. कुलकर्णी याला ‘सीबीआय’ने पुण्यातून ताब्यात घेतले होते. पुण्यातील बिबवेवाडी भागात राहणारी ब्युटीपार्लरचालक महिला मनीषा वाघमारे हिला अटक करण्यात आली होती.
वाघमारेची चौकशी करण्यात आली. तेव्हा वाघमारेच्या घरात माॅडर्न महाविद्यालयातील जीवशास्त्राची शिक्षिका मनीषा गुरुनाथ मांढरे हिने विद्यार्थ्यांसाठी विशेष मार्गदर्शन वर्ग घेतला होता. त्यानंतर मांढरेला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आली. दिल्लीतील ‘सीबीआय’कार्यालयात चैाकशी करण्यात आल्यानंतर तिला अटक करण्यात आली. मांढरे, प्रा. कुलकर्णी हे परीक्षा प्रक्रियेशी संबंधित होते. तपासादरम्यान त्यांना विद्यार्थ्यांना प्रश्न आणि अचूक उत्तरांची माहिती दिली होती.
सीबीआयकडून या प्रकरणाचा सखोल तपास करण्यात येत आहे, तपासात मिळालेल्या माहितीनुसार हवालदार हिला अटक करण्यात आली. तिची चौकशी सुरू असून, या प्रकरणात आणखी काही महत्त्वाची माहिती मिळण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
आतापर्यंत ११ जण अटकेत
पेपरफुटी प्रकरणात ‘सीबीआय’ने पुणे, जयपूर, नाशिक, लातूर, दिल्ली, अहिल्यानगर, गुरुग्राम येथे कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी आतापर्यंत ११ जणांना अटक केली असून, त्यांच्याकडून लॅपटाॅप, मोबाइल संच, बँक व्यवहारांची कागदपत्रे, तसेच अन्य इलेक्ट्राॅनिक उपकरणे ताब्यात घेण्यात आली आहेत. मोबाइल संच, लॅपटाॅपचे तांत्रिक विश्लेषण करण्यात येत असून, बँक व्यवहारांची तपासणी सुरू आहे. या प्रकरणात ‘सीबीआय’ने लातूमधील डाॅ. मनोज शिरुरे यांना ताब्यात घेतले असून, त्यांची चौकशी सुरू आहे.
मनीषा हवालदार निलंबित
‘नीट’ पेपरफुटी प्रकरणात मनीष हवालदार सामील असल्याचे उघडकीस आल्यानंतर विद्या प्रसारिणी सभेने तिला निलंबित केले असून, हवालदार ही संस्थेच्या शेठ हिरालाल सराफ प्रशालेत होती. ही घटना खेदजनक असल्याचे पत्रकात म्हटले आहे.
