पुणे : देशभरात गाजत असलेल्या ‘नीट’ प्रश्नपत्रिकाफुटी प्रकरणात पुण्यातील जीवशास्त्राच्या प्राध्यापक मनीषा गुरुनाथ मांढरे हिला केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) पुण्यातून अटक केली. मांढरे ही परीक्षा प्रक्रियेशी (एनटीए) संबंधित आहे. पेपरफुटी प्रकरणात ती सामील असल्याचे उघडकीस आल्यानंतर तिला अटक करण्यात आली, अशी माहिती सीबीआयने दिली.
मनीषा मांढरे ही वरिष्ठ प्राध्यापिका आहे. ती परीक्षा प्रक्रियेशी संबंधित आहे. या प्रकरणात तिची दिल्लीत चौकशी करण्यात आली. त्यानंतर तिला अटक करण्यात आली. परीक्षा प्रक्रियेशी संबंधित असल्याने तिचा वनस्पतीशास्त्र, तसेच प्राणीशास्त्र या विषयाच्या प्रश्नपत्रिकांशी संबंध होता. या प्रकरणात बिबवेवाडीतील ब्युटीपार्लरचालक महिला मनीषा वाघमारे हिला अटक करण्यात आली होती. वाघमारेने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी तिच्या घरी बोलविले होते. तेथे प्रा. मांढरेने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांना प्रश्न, अचूक उत्तरांची माहिती तिने दिली होती. ही बाब तपासात उघडकीस आल्यानंतर प्रा. मांढरेला अटक करण्यात आली, अशी माहिती सीबीआयकडून देण्ात आली.
‘नीट’ प्रश्नपत्रिकाफुटी प्रकरणातील मुख्य सूत्रधार प्रा. पी. व्ही. कुलकर्णी याला केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) पुण्यातून शुक्रवारी अटक केली. कुलकर्णी हा रसायनशास्त्राचा प्राध्यापक आहे. कुलकर्णी हा परीक्षा प्रक्रियेशी संबंधित होता. पेपरफुटी प्रकरणात तो सामील असल्याचे उघडकीस आल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. कुलकर्णीची सीबीआयच्या पथकाने चौकशी केली. चौकशीत मांढरे ही या प्रकरणात सामील असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर तिला सीबीआयने अटक केली.
‘नीट’ प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणात सीबीआयने अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी येथून धनंजय लोखंडे (वय २६) याला ताब्यात घेतले. लोखंडे हा पुण्यातील काही जणांच्या संपर्कात असल्याची माहिती तपासात मिळाली. त्यानंतर बिबवेवाडी परिसरात ब्यूटी पार्लर चालविणारी मनीषा वाघमारे आणि अभियांत्रिकी शाखेत शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थ्याला पुणे पोलिसांनी बुधवारी (१३ मे) ताब्यात घेतले. धनंजय लोखंडे आणि मनीषा वाघमारे हिला अटक केली. या प्रकरणात जयपूरमधील तीन, गुरुग्राममधील एक आणि नाशिकमधील एका आरोपीचा समावेश आहे.
सीबीआयने देशातील वेगवेगळ्या भागांत छापे टाकले. कागदपत्रे, मोबाइल संच, तसेच अन्य इलेक्ट्राॅनिक उपकरणे जप्त करण्यात आली होती. जयपूर, ग्रुरुग्राम, नाशिकि, पुणे, अहिल्यानगर परिसरातून आतापर्यंत नऊ आरोपींना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणातील पाच आरोपींना सात दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे. पुण्यातून प्रा. पी. व्ही. कुलकर्णी, मनीषा वाघमारे यांना अटक करण्यात आली आहे. त्यांना पुण्यातील विशेष न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. कुलकर्णी, वाघमारे यांची प्रवासी कोठडी (ट्रान्झिट रिमांड) मिळवून त्यांना दिल्लीतील विशेष सीबीआय न्यायालयात हजर करण्यात येणार आहे, अशी माहिती सीबीआयकडून देण्यात आली आहे.
दरम्यान, या प्रकरणात अटक करण्यात आलेली आरोपी मनीषा वाघमारे ही ब्युटीपार्लरचालक आहे. तिचे पती दंतवैद्यक तज्ज्ञ आहेत. तिच्या पतीचे बिबवेवाडीत रुग्णालय आहे. सीबीआयच्या पथकाने वाघमारेच्या पतीच्या रुग्णालयात जाऊन चौकशी केली. रुग्णालय बंद असल्याचे निदर्शनास आले. वाघमारेच्या डाॅक्टर पतीची या प्रकरणात सीबीआयकडून चौकशी करण्यात येणार आहे.
मार्गदर्शन वर्गात शिकवलेले प्रश्न ‘नीट’ परीक्षेत
प्रा. मनीषा मांढरेला दिल्लीत अटक करण्यात आली. ‘नीट’ परीक्षेच्या प्रश्नपत्रिका तयार करण्याच्या प्रक्रियेत ती सहभागी झाली होती. ब्युटीपार्लरचालक मनीषा वाघमारेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना एकत्र करुन त्यांना विशेष मार्गदर्शन केले. मार्गदर्शन वर्गात शिकविण्यात आलेले प्रश्न नीटच्या प्रश्नपत्रिकेत आले होते, असे सीबीआयने स्पष्ट केले आहे.
