पुणे : ‘राज्यातील अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेवर ‘नीट’ पेपरफुटीचा परिणाम होणार नाही. या प्रवेश प्रक्रियेत ‘नीट’ परीक्षेतील गुण ग्राह्य धरले जाणाऱ्या १५ टक्के अखिल भारतीय कोट्यातील जागांचा समावेश न करता, त्या जागा वगळून उर्वरित जागांवरील प्रवेश प्रक्रिया वेळेत सुरू करण्यात येतील,’ असे स्पष्टीकरण राज्य समाइक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) दिले. तसेच, अभियांत्रिकी अभ्यासक्रमास प्रवेश घेऊ इच्छिणारे विद्यार्थी, पालकांनी प्रवेश प्रक्रियेबाबतचा संभ्रम बाळगू नये, असे आवाहनही करण्यात आले.
‘नीट’ पेपरफुटीमुळे राज्यातील अभियांत्रिकी आणि औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला फटका बसण्याचे किंवा प्रवेश रखडणार असल्याचे वक्तव्य राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी नुकतेच केले होते. त्यामुळे राज्यभरातील विद्यार्थी, पालकांमध्ये संभ्रमाची स्थिती निर्माण झाली होती. मात्र, अखिल भारतीय कोट्याच्या १५ टक्के जागांसाठी सर्वच प्रवेश प्रक्रिया रखडवणे योग्य नाही, त्या १५ टक्के जागांसाठी स्वतंत्रपणे प्रवेश प्रकिया राबवणे शक्य असल्याकडे तज्ज्ञांकडून लक्ष वेधण्यात आले होते.
या पार्श्वभूमीवर, सीईटी सेलचे आयुक्त दिलीप सरदेसाई यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे याबाबत सविस्तर स्पष्टीकरण दिले. ‘नीट परीक्षेचे गुण कृषी अभियांत्रिकी, जैवतंत्रज्ञान, अन्न अभियांत्रिकी, लेदर तंत्रज्ञान, पॅकेजिंग तंत्रज्ञान, औषधनिर्माणशास्त्र, मुद्रण अभियांत्रिकी, फॅशन तंत्रज्ञान, टेक्स्टाइल रसायनशास्त्र या नऊ अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी १५ टक्के अखिल भारतीय कोट्यातील जागांसाठी ग्राह्य धरण्यात येतात. मात्र, हे अभ्यासक्रम राज्यातील केवळ १७ शासनमान्य संस्थांमध्येच आहेत. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने निर्धारित केलेल्या वेळापत्रकानुसार राज्यातील तांत्रिक व्यावसायिक अभियांत्रिकी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येते. त्यामुळे अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेकडून जाहीर होणाऱ्या वेळापत्रकानुसार प्रवेश प्रक्रिया आयोजित करण्यात येतील,’ असे ‘सीईटी सेल’ने स्पष्ट केले.
नीट फेरपरीक्षा २०२६चा निकाल जाहीर होण्यास विलंब झाल्यास संबंधित नऊ अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ‘नीट’ परीक्षेतील गुणांच्या आधारे प्रवेश दिल्या जाणाऱ्या १५ टक्के अखिल भारतीय कोट्यातील जागांचा समावेश न करता, त्या जागा वगळून उर्वरित जागांवरील प्रवेश प्रक्रिया वेळेत सुरू करण्यात येईल. त्यामुळे अभियांत्रिकी अभ्यासक्रमास प्रवेश घेऊ इच्छिणारे विद्यार्थी, पालकांनी प्रवेश प्रक्रियेबाबतचा संभ्रम बाळगू नये, असेही स्पष्ट करण्यात आले.
